राफेल शस्त्रपूजेच्या वादावरुन एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टोमणे मारले आहेत. “पूजा करण्यासाठी म्हणून त्यांनी लिंबू राफेलच्या चाकाखाली ठेवले. आम्ही लिंबाचे सरबत करुन लोकांना देतो” असे ओवेसी मुंबईमधील सभेत बोलताना म्हणाले. एआयएमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी यांची मुंबईत सभा झाली.

मागच्या आठवडयात फ्रान्समध्ये समारंभपूर्वक राफेल फायटर विमान इंडियन एअर फोर्सकडे सुपूर्द करण्यात आले. विजयादशमीचा मृहूर्त असल्याने राजनाथ यांनी राफेलची विधीवत पूजा केली. विमानाच्या कॉकपीटजवळ नारळ तर चाकाखाली लिंबू ठेवण्यात आले होते. त्यावरुन भारतात बराच मोठा वाद झाला.

हवाई दलातील राफेलच्या समावेशाला धार्मिक रंग दिल्याने काँग्रेसने भाजपा सरकारवर सडकून टीका केली होती. राफेल हस्तांतरणाच्या सोहळयाचे भगवेकरण केल्याचा आरोप काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केला होता. विजयादशमीचा राफेल विमानाशी संबंध येत नाही. तो एक सण आहे जो आपण सर्व साजरे करतो. त्याचा विमानाशी संबंध जोडण्याचे काय कारण? असा सवाल संदीप दीक्षित यांनी विचारला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राफेलच्या शस्त्र पूजनावर खरमरीत शब्दात टीका केली होती. “पीएमसी बँकेच्या खातेदारांनी दोन-दोन लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाजाला लावून ठेवायला हवेत. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतं तर तुमचे पैसे का नाही”, अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेच्या व्यवहारांसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यावरुन दोन लिंबू ठेवून पीएमसी बँक देखील सुरक्षित करावी असा टोला आव्हाड यांनी लगावला होता.