अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी आणि प्राण्यांची चिन्हे यावरील बंदी यातून मार्ग काढत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी दैनंदिन जीवनाशी निगडित, मतदारांपर्यंत सहज पोहोचू शकणारी आणि बदलत्या काळाचे प्रतिनिधित्व करणारी १९७ निवडणूक चिन्हे निश्चित केली आहेत.

एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवारांनी एकाच चिन्हावर दावा केल्यास त्यांनी उमेदवारी अर्जासोबत मागणी केलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना ही चिन्हे देण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत आयोगाने ३०१ चिन्हे दिली होती. त्यात राष्ट्रीय पक्षांसाठी सात, प्रादेशिक पक्षांसाठी ६४, तर अपक्ष उमेदवारांसाठी २३० प्रकारच्या चिन्हांचा समावेश होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे कमळ, काँग्रेसचा हात, तृणमूल काँग्रेसचे फुले आणि गवत, बसपचे हत्ती, कम्युनिस्ट पार्टीचे कणीस आणि विळा, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचा हातोडा, विळा आणि तारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ, राष्ट्रीय जनता पार्टीचे पुस्तक ही राष्ट्रीय पक्षांसाठी, तर शिवसेनेचा धनुष्यबाण आणि मनसेचे रेल्वे इंजिन राज्य पक्षांसाठी, अशी एकूण १० चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत. अपक्षांसाठी १९७ चिन्हे उपलब्ध करून देताना आयोगाने लोकसभा निवडणुकीपेक्षा ९४ चिन्हे कमी केली आहेत.  उमेदवारास मतदारांपर्यंत सहजपणे आपले निवडणूक चिन्ह पोहचविता यावे यासाठी सध्याच्या काळात लोकप्रिय ठरणारे एअर कंडिशनर, पेनड्राइव्ह, व्हॅक्युम क्लीनर, मोत्यांचा हार, ब्रेड टोस्टर, डिश अँटेना, संगणक माऊस, लॅपटॉप अशी नवीन, तर टाइपरायटर आणि ग्रामोफोन अशा कालबाह्य़ झालेल्या वस्तू निवडणूक चिन्हे म्हणून देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सफरचंद, आटो रिक्षा, फुगा, बांगडय़ा, बॅट, जाते, माइक, पाव, किटली, भाजीपाला, फळे, संगणकाचे साहित्य, झोपाळा, यासह खाद्यपदार्थाचे ताट आदी चिन्हांचा यात समावेश करण्यात आला आहे.

नव्या-जुन्यांचा मेळ

निवडणूक चिन्हांमध्ये नव्या आणि जुन्यांचा मेळ घालत लोकप्रिय लुडो खेळाच्या चिन्हाचा समावेश करण्यात आला आहे. सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाजाची घंटा, नरसाळे, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, करनी-थापी, सेफ्टी पिन- टाचणी, स्पॅनर-पाना, तंबू, टायर, लोकर आणि सुई, कपाट, दुर्बीण, कॅन, नारळाची बाग, दरवाजाचे हँडल, ऊ स-शेतकरी, शिरस्त्राण, पत्रपेटी, नासपती, करवत, स्टेप्लर, भालाफेक,  बिस्किट, सिमला मिरची, कलर ट्रे-ब्रश, ड्रिल मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, टीलर, व्हायोलिन, फळा, गालिचा, मोबाइल चार्जर, संगणक, डंबेल्स, गॅस शेगडी, वाळूचे घडय़ाळ, हंडी, कात्री, स्टूल, टॉफीज, चालण्याची काठी, बेबी वॉकर, कॅरम बोर्ड, संगणक माऊस, आइस्क्रीम, जेवणाचा डबा अशीही चिन्हे दिली आहेत. त्याचबरोबर कूकर, शिवणयंत्र, स्टॅम्प्स, चिमटा, फुलकोबी, खाट, विजेचा खांब, अद्रक, पाणी गरम करण्याचा रॉड, तुतारी वाजवणारा माणूस, पेन स्टँड, पंचिंग मशीन, जहाज, झोपाळा, पाकीट, बांगडय़ा, लिफाफा, काचेचा पेला, काडेपेटी, पेन्सिलचा डबा, टूथ पेस्ट आदी चिन्हे देण्यात आली आहेत.

प्राधान्यक्रमानुसार चिन्हांचे वाटप

चिन्हांचे वाटप करताना राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची चिन्हे वेगळी करून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत आघाडय़ांना त्यांनी मागणी केल्यानुसार चिन्हे दिली जातील. मात्र एखाद्या मतदारसंघात एकाच चिन्हाची मागणी अनेक उमेदवारांनी केली असल्यास त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना चिन्हवाटप करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप शिंदे आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी दिली.