विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांड असताना राज्यातील आणि केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी वाट पाहण्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. युतीसंदर्भात भाजपाने आस्ते कदम भूमिका घेतली असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र भाजपाने आक्रम झाल्याचे दिसत आहे. भाजपाचे नेते आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी तर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वक्तव्य केले आहे. इतकचं नाही रावळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेशही दिले आहे. पुन्हा निवडणूक झाल्यास अगदी थोड्याश्या फरकाने हारलेल्या जागा भाजपा नक्की जिंकेल असा विश्वास रावळ यांनी व्यक्त केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रावळ यांनी धुळे जिल्ह्यामधील सर्व जागा लढवण्याची भाजपा कार्यकर्त्यांची तयारी असल्याचे सांगितले. “धुळ्यात (जिल्ह्यात) विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. पाचपैकी चार जागांवर भाजपाने यंदा निवडणूक लढवली. साक्रीमध्ये पाच हजार मतांनी भाजपाचे बंडखोर उमेदवार निवडून आला. धुळे ग्रामीणमध्ये आठ हजार मतांनी भाजपाचा उमेदवार पराभूत झाला. जिल्ह्यातील या दोन निकालांमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पाचही जागा पक्षाने लढवायला हव्यात असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. आमची त्यासाठी तयारी आहे,” असं मत रावळ यांनी नोंदवलं.

दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमावारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ते भेट घेणार असून राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल याबद्दल चर्चा करणार आहेत.