28 May 2020

News Flash

दुष्काळमुक्ती आणि रोजगारावर भर ; भाजपच्या संकल्पपत्रातील आश्वासन

गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने महाराष्ट्रात ५५ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.

मुंबई : शिवसेनेने निवडणूक वचननाम्यात लोकानुनयी आश्वासनांची खैरात केली असताना, भाजपने कोणत्याही नवीन घोषणा किंवा आश्वासने देण्याचे टाळले आहे. राज्यात पुढील पाच वर्षांत एक कोटी रोजगारनिर्मिती, दुष्काळमुक्ती आणि केंद्र सरकारच्या मदतीने पायाभूत सुविधा क्षेत्रात पाच लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन भाजपने ‘संकल्पपत्रा’त दिले आहे.

विधानसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे सहा दिवस उरले असताना भाजपने मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते संकल्पपत्र जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आदी या वेळी उपस्थित होते.  गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने महाराष्ट्रात ५५ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. पुढील पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार आहोत. तसेच ३० हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात येतील. कामगारांनाही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल याची सोय केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्याच्या प्रत्येक विभागात टेकपार्क उभारण्यात येईल, असेही संकल्पपत्रात जाहीर करण्यात आले आहे. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात ठेवीदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बदलण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत केले आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र हा भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध झाला होता. फडणवीस यांनी कार्यक्षमता व पारदर्शकता आणली. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदलली आणि राजकीय वातावरणच बदलून गेले’, अशा शब्दांत नड्डा यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.

संकल्पपत्रात काय?

’ पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार. समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार. वैनगंगेचे वाहून जाणारे पाणी पश्चिम विदर्भात वळवणार.

’ मराठवाडा जलसंजाल योजनेतून धरणे जोडून पाणीपुरवठा करणार.

’ कृष्णा-कोयना खोऱ्यातील नद्यांमधून पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी भागाला

’ सौरऊर्जेतून कृषिपंपाला दिवसा १२ तास वीजपुरवठा करणार.

’ एक कोटी कुटुंबांना महिला बचतगटांशी जोडून महिलांना रोजगार देणार.

’ राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार.

नवे संकल्प

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘भारतरत्न’ने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. हा पुरस्कार केंद्र सरकारकडून दिला जातो. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

टपाल तिकिटे : सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने टपाल तिकिटे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे.

टोलमुक्ती बासनात : पाच वर्षांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण या निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही.  राज्यातील अनेक रस्ते टोलमुक्त करीत राज्य सरकारने तो विषय कधीच संपवला असल्याचे  फडणवीस यांनी सांगत हा विषय आता भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवर नसल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2019 4:14 am

Web Title: bjp releases manifesto 2019 for maharashtra assembly election zws 70
Next Stories
1 प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडी’ची नोटीस
2 ‘पीएमसी बँके’च्या दोन खातेदारांचा तणावाने मृत्यू
3 पोलिसांना फक्त गृहीतच धरले जाते
Just Now!
X