राज्यभरात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता संपूर्ण राज्यातून महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आपली दोन अंकी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय नाना काकडे, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश मोकाटे, पृथ्वीराज सुतार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील पाच वर्षात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे आज कोल्हापूरमधील जनता समाधान व्यक्त करत आहे. असाच विकास पुढच्या पाच वर्षात पुणे जिल्ह्याचा करायचा आहे. कोथरुड मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाल्यापासून अनेक जण शंका व्यक्त करत होते की, हे सहज उपलब्ध होतील की नाही? पण मी जसं कोल्हापूरमध्ये सहज उपलब्ध असायचो, राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी मंत्रालयासमोरचाच बंगला निवडला. त्याच प्रकारे कोथरूडकरांना मी सहज उपलब्ध असून, यासाठी मी संपूर्ण नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.