महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानात जयपूरमध्ये ठेवले आहे. काँग्रेस पक्षनिधीच्या कमतरतेचे कारण देत असली तरी त्यांनी आपल्या आमदारांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहे. बहुमताच्या आकडयाची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये सर्व आमदारांना ठेवले आहे.

राजस्थान सरकार विकासकामांसाठी निधीच्या कमतरतेचे कारण सतत पुढे करत असते. पण याच राजस्थान सरकारने महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची आलिशान हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था केली आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांना ब्यूना विस्टा रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. जयपूर-दिल्ली महामार्गापासून हे रिसॉर्ट दीड किलोमीटर अंतरावर आहे.

या रिसॉर्टमध्ये ५० खासगी व्हिला असून प्रत्येक व्हिलासाठी जलतरण तलाव आहे. या रिसॉर्टमध्ये दोन रेस्टॉरंट, दोन बार आणि स्पा सेंटर आहे. जिथे पाहुणे रिलॅक्स होण्यासाठी जातात. एक फ्रेंच राजकारण्याकडे या रिसॉर्टची मालकी असून फ्रेंच आणि राजस्थानी पद्धतीचे आर्किटेक्चर आहे. ब्यूना विस्टा रिसॉर्टमध्ये एका साध्या व्हिलाचे दिवसाचे शुल्क २४ हजार रुपये आहे.

हेरिटेज व्हिलाचे दिवसाचे शुल्क २५ हजार रुपये आहे. सर्वात महागडया रॉयल व्हिलाचे दिवसाचे शुल्क १ लाख २० हजार रुपये आहे. प्रत्येक व्हिलामध्ये खासगी जलतरण तलाव आहे. रॉयल व्हिलामध्ये उतरणाऱ्या पाहुण्यांना खास सुविधा दिल्या जातात. मागच्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे ४४ आमदार या रिसॉर्टमध्ये आहेत. आमदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असून त्या सर्वांना जोधपूर, पुष्कर आणि अजमेर या ठिकाणी फिरण्यासाठी नेण्यात आले होते. हे आमदार जिथे कुठे जातात तिथे त्यांच्यामागे मोठा पोलीस बंदोबस्त असतो.