राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही आज पदभार न स्विकारल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारत कामकाज करण्यास सुरुवात केली असून, अजित पवार मात्र पदभार न स्विकारताच घऱी माघारी फिरले.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारत नव्या कार्यकाळातील पहिल्या आदेशावर सोमवारी सही केली. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर त्यांनी ही सही केली. हा सही केलेला धनादेश त्यांनी दादरच्या कुसूम वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

दरम्यान, अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत. अजित पवारांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरही त्यांचे मन वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

विधानभवनात रामराजे निंबाळकर यांच्या चेंबरमध्ये ही बैठक सुरु होती. चार तासांच्या चर्चेनंतर निंबाळकर, पवार, वळसे-पाटील, भुजबळ हे चारही नेते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. मात्र, बाहेर पडल्यानंतर या नेत्यांनी माध्यमांशी तुरळक संवाद साधला. यातून ते अजित पवारांचे मन वळवण्यात अपयशी ठरल्याचे जाणवत होते. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणं झालं नसल्याचं यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांना समजावणार असल्याचे वळसे-पाटील म्हणाले.