चंद्रशेखर बोबडे

नागपूर-दक्षिण-पश्चिम

गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घोडदौड केली.  विधानसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जात असून, स्वत:च्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात त्यांना किती मताधिक्य मिळते याचीच उत्सुकता आहे. फडणवीस यांना काँग्रेसच्या आशीष देशमुख यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

सलग तीन वेळा  चढत्या मताधिक्याने जिंकण्याचा अनुभव फडणवीस यांच्या पाठीशी आहे. तर देशमुख यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, सावनेरमधून पराभूत झाले. २०१४ मध्ये काटोलमधून भाजपकडून ते विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या विधानसभा मतदारसंघात ५५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरही  मतदारसंघाशी संपर्कात आहेत. त्यांनी ३०० कोटींपेक्षा जास्त निधीतून मतदारसंघाचा विकास केल्याचा  दावा  भाजपकडून केला जातो आहे. संघाचा पाठिंबा,  संघटनात्मक पाठबळ, स्वच्छ प्रतिमा आणि मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असणे या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू ठरतात. मतदारसंघात काँग्रेसची मोठय़ा संख्येने असलेली पारंपरिक मते, संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे जाळे याचा लाभ आशीष यांना मिळणार आहे.

मतदारसंघातील काही वस्त्यांमध्ये पट्टेवाटपाचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न होणे, भाजपच्या नगरसेवकांविषयी  नाराजी, खड्डय़ामुळे त्रस्त नागरिक या बाबी फडणवीस यांच्यासाठी अडचणीच्या आहेत. आशीष यांचा विचार केल्यास त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ही वेळोवेळी बदललेली राजकीय भूमिका, गटबाजी आणि बाहेरचा उमेदवार म्हणून  शिक्का या बाबी विरोधात जाणाऱ्या आहेत.