शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर, कुणबी, माळी,  तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी आज चर्चा केली. यावेळी त्यांनी या समाजातील लोकांच्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, निवडणूक म्हणजे लोकशाहीतील युद्ध आहे असे सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रकारे सर्व मावळे एकजुटीने युद्धात उतरत होते, तसेच आपण सर्वजण निवडणुकीच्या युद्धाला समोरे जाऊ भगवा फडकवू असे ते म्हणाले. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी सर्व समाजातील लोकं शिवसेनेबरोबर असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज आगामी निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करा असे त्यांनी यावेळी सर्व समाजाच्या नेत्यांना आव्हान केले. यावेळी  त्यांनी आरेच्या मुद्दयावर जास्त बोलणे टाळले,  मी आरे संदर्भात स्वतंत्र पत्रकारपरिषद घेणार असल्याचेही सांगत, निवडणूक संपल्यानंतर आमचे सरकार येणार आहे, त्यानंतर  झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं? ते आम्ही  ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

या अगोदर उद्धव ठाकरे विविध समाजाच्या नेत्यांशी बोलताना म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आपल्यापैकी एकही आले नाही, यासाठी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे. आता तुम्ही प्रामाणिकपणे आलात व मला एकच म्हणालात आहात की, आम्हाला काही नको फक्त आम्ही ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. जर मग समाजाला न्याय मिळवून देणारं सरकार नसेल तर ते सरकार काय कामाचं? तुमच्यापैकी आज कोणीही आमदार,खासदार नाहीत, मात्र तुम्ही आमच्याबरोबर आहात. हीच ताकद मला हवी आहे, साधीसुधी माणसंच इतिहास घडवत असतात. त्यामुळे आता इतिहास घडणार नाही, तर तो आम्ही घडवणार आहोत. यावेळी त्यांनी समाजाच्या नेत्यांना तुम्ही केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः एक शिवसेना म्हणून कटीबद्ध असल्याचेही सांगितले.

आणखी वाचा- फक्त हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक – शरद पवार

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की,   सर्व जाती-पाती व समाजाचे लोक माझ्याबरोबर आहेत. या अगोदरच्या युतीच्या सरकारमध्ये सरमिसळ होती, कारण सुरूवातीला आम्ही निवडणुकीत बरोबर नव्हतो, आम्ही निवडणूक स्वतंत्र लढलो. नंतर आम्ही एकत्र आलो. यामुळे त्यांनी काही दिलेली आश्वासनं असतील आम्ही काही दिलेली वचनं असतील या सगळ्यांची सांगड घालत घालत गेली पाच वर्षे कारभार झाला. या काळात मराठा, धनगर या समाजांच्या मागण्या पूर्ण करून त्या अंमलात कशा आणायच्या यासाठी पावलं टाकली गेली आहेत. धनगरांना आरक्षण देताना आम्ही आदिवासींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, त्यामुळे यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला तुम्ही जात लावू नका, जर माझं सरकार असेल तर माझं कर्तव्य आहे की राज्यात कुणीही भूकेला राहता कामा नये. समाजाचे नेते हे जागांसाठी शिवसेना महायुतीबरोबर आलेले नाहीत, ते आमचे मित्र आहेत असेही ठाकरे म्हणाले.