डी.वाय.पी. सिटी मॉलवरील आरोपाबाबत डॉ.संजय डी. पाटील हे निवडणुकीनंतर खुलासा करणार आहेत. मात्र बेताल आरोप करणाऱ्यांवर त्यांच्यावतीने कायदेशीर कारवाईही केली जाणार असल्याचा इशारा सतेज पाटील समर्थकांनी दिल्याने पाटील — महाडिक वादाला नवे रूप मिळाले आहे.

डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीच्या भाडे आकारणीतून महापालिकेची पावणे तीन  कोटींच्या फसवणुकीचा आरोप महाडिक समर्थक सुनील कदम यांनी केला होता. त्याला उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, अर्जुन माने यांनी उत्तर दिले आहे. कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत ऋतुराज पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दक्षिणची ही लढाई कोल्हापूरची  स्वाभिमानी जनता विरूद्ध महाडिक या टप्प्यावर आली आहे. पराभव दिसत असल्याने महाडिक बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बेताल आरोप करत सुटले आहेत, असे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. निवडणुकीतून आमचे लक्ष विचलित करण्याचा हा महाडिकांचा डाव असून तो आम्ही नक्की ओळखला आहे. आरोपांना उत्तर देण्यात फारसा वेळ न घालवता विजयाचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही काम करत आहोत. महाडिकांचा आजपर्यंतचा इतिहास पाहता, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांची नाहक बदनामी करण्याचे कु टिल कारस्थान करत आले आहेत. तोच कित्ता गिरवत वैयक्तिक विषयावरून बदनामी करण्याच्या हेतूनेच डी.वाय.पी. सिटी मॉलबाबत आरोप केलेले आहेत.

स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आणि व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी महाडिक नेहमीच सत्तेच्या वळचणीला गेले आहेत. ज्यांनी महापौर असताना आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आरक्षणे उठविली, त्यानी आपल्या बगलबच्च्यांच्या तोंडून आरोप करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असा प्रकार आहे, असा प्रतिहल्ला त्यांनी सुनील कदम यांच्यावर केला आहे.