काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं आजच अभिनेत्री आणि खासदारकीला उभ्या राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केलं. या राजीनाम्यावरुन आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात जुंपली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत असं म्हटलं आहे. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी उर्मिला मातोंडकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

 

मात्र उर्मिला मातोंडकर यांना ज्यांनी पक्षात आणले त्यांच्यामुळेच त्यांनीच अंतर्गत राजकारण सुरु केले. मुंबई उत्तर भागातल्या नेत्यांनाच उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे असं ट्विट मिलिंद देवरा यांनी केली आहे. त्यामुळे नाव न घेता त्यांनी संजय निरुपम यांनाच उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यासाठी जबाबदार धरलं आहे हे स्पष्ट होतं आहे. कारण संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक नेत्यांमुळेच माझा पराभव झाला असा मजकूर असलेलं पत्र उर्मिला मातोंडकर यांनी लिहिलं होतं. १६ मे रोजी लिहिलेल्या या पत्राची दखल घेतली गेली नाही.

“आपण अनेकदा नाराजी व्यक्त केली परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. पक्षांतर्गत राजकारणात आपल्याला कोणताही रस नाही. तसंच राजकारणासाठी आपला वापर होऊ नये यासाठी आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत”, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.