इंदापूर मतदार संघातून भाजपाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रेय भरणे यांना उमेदवारी मिळणार आहे. हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामध्ये विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. या लढतीकडे इंदापूरसह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे की, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील विजयी होणार, यासाठी दोन कार्यकर्त्यांनी स्टँप पेपरवर पैज लावली आहे.

इंदापूर मतदार संघातील जंक्शनमधील नितीन भारत साबळे आणि संभा भारत बनसोडे यांनी दोघांच्या जय-पराजयावर पैज लावली आहे. आमदार भरणे जेवढ्या मताधिक्यांनी विजयी होतील तेवढी रक्कम नितीन साबळे स्वखुशीने देणार आहेत. हर्षवर्धन पाटील विजयी झाल्यास मताधिक्याएवढी रक्कम बनसोडे हे साबळे यांना देणार आहेत. तसा त्यांनी करार केला आहे.  या लेखी पत्रकावर स्टॅम्प (तिकीट) लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आनंदनगर गावचे उपसरपंच रोहित मोहोळकर यांनी या पैजेच्या रकमेची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार, निकालानंतर २० दिवसांत संबंधित रक्कम विजयी उमेदवाराच्या समर्थकांना देण्यात येणार आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या समर्थकांमधील या पैजेसाठी पाच साक्षीदारांनीही सह्या दिल्या आहेत. एका लेखी पत्रकारवर स्टॅम्प तिकीट लावून सरकारी दस्तावेज पद्धतीने ही पैज लागली आहे.

नितीन भारत साबळे आणि संभा भारत बनसोडे यांच्या पैजेची इंदापूरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये कोण जिंकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. २१ ऑक्टोबर रोजी विधनासभेचं मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी महासंग्रामाचा निकाल लागणार आहे. त्यादिवशीच शर्यत कोण जिंकणार हेही स्पष्ट होणार आहे.