शिवसेनेच्या टीकेला निवडणुकीनंतर मातोश्रीसमोर जाऊन उत्तर देईन, असा इशारा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी दिला. मला कोकणचा विकास करायचा आहे, मात्र शिवसेनेकडे विकासाची दृष्टी नाही, असे ते म्हणाले.

या वेळी भाजपचे पुरस्कृत उमेदवार राजन तेली, माजी खासदार निलेश राणे, संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मनोज नाईक, सुधीर आडीवरडेकर, राजू बेग, गुरुनाथ पेडणेकर, पंकज पेडणेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर व अन्य उपस्थित होते.

या वेळी राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मी विविध योजना आणल्या. सी वर्ल्डसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भांडून आणला. भूसंपादनासाठी शंभर कोटींची तरतूदही केली. मात्र त्यानंतरच्या पाच वर्षांत एक इंच जमीन तरी संपादित केली का? प्रकल्पाची एक वीट तरी लागली का? एका सी वर्ल्ड प्रकल्पामुळे या जिल्ह्य़ाची आर्थिक भरभराट झाली असती. देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्य़ात आले असते. मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असती. मात्र या कपाळ करंटय़ांमुळे हा प्रकल्प रखडला. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. तो निश्चितच मार्गी लागेल. मात्र त्या वेळी हा कपाळकरंटा पालकमंत्री वा आमदारही असणार नाही, असा विश्वासही नारायण राणे यांनी या वेळी व्यक्त केला.

आपल्या जिल्ह्य़ात या वर्षी प्रचंड पाऊस झाला. मात्र एवढा पाऊस पडूनही सिंचनक्षमता वाढली नाही. आज महाराष्ट्रची सिंचनक्षमता १८.५ टक्के आहे. मी जिल्ह्य़ात आणलेली धरणे ज्या वेळी पूर्ण होतील त्या वेळी महाराष्ट्राप्रमाणेच आपल्या जिल्ह्य़ाची सिंचनक्षमताही १८.५ टक्के होईल. त्यासाठी नियोजनाची गरज आहे. मात्र मागील पाच वर्षांत ते झाले नाही. तिलारी ते मालवणसारखी महत्त्वाकांक्षी नळ योजना मी जिल्ह्य़ात झालेल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावून घेतली होती. तब्बल २५८ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्याचे भूमीपूजनही झाले होते. मात्र त्याच्यातही टक्केवारी मागून केसरकरांनी ही योजना बंद पाडली. न जाणो मातोश्रीवरही त्याचे अर्धे पैसे गेले असतील, अशी टिकाही राणे यांनी केली.

आज केसरकर गोव्याच्या मंत्र्यांना प्रचारासाठी विरोध करीत आहेत. पर्यटनात जिल्हा पुढे जाईल म्हणून गोव्याचे मंत्री इकडे येत आहेत, अशी हास्यास्पद भाषा करीत आहे. गेल्या काही वर्षांत गोवा पर्यटनातून समृद्ध झाला. तेथील भाजपच्या सरकारने त्यासाठी विशेष मेहनत घेतली. मात्र तू या जिल्ह्य़ाच्या पर्यटनवाढीसाठी काय केलेस? गोव्यात भाजपचे सरकार आहे. तेथील लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. येथील उमेदवार भाजप पुरस्कृत आहे. त्यामुळे त्याच्या प्रचारासाठी ते येणारच. तू कोण त्यांना अडवणारा? मुळात जिल्ह्य़ापेक्षा तू गोव्यातच जास्त असतोस. त्यामुळे तुझे कर्तृत्व त्यांना अधिक माहिती आहे, अशी उपरोधिक टीकाही नारायण राणे यांनी केली.

आपल्या जिल्ह्य़ाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. आंबा, काजू, फणस, नारळ अशी विविध फळे आपल्याकडे पिकतात. मात्र या फळांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग म्हणावे तसे निर्माण झाले नाहीत. हिमाचल प्रदेश सफरचंदासारख्या एका फळावर समृद्ध बनला आहे. मलेशियासारखा देश पामतेलाच्या जिवावर समृद्ध बनला. आपल्याकडे तर विविध फळे आहेत. मासे आहेत. या सर्वावर प्रक्रिया उद्योग निर्माण करून जिल्ह्य़ात समृद्धी आणायची आहे. त्यासाठी हुशार व कर्तबगार लोकप्रतिनिधीची गरज आहे, असे राणे म्हणाले.

भाजपने दिलेले तिनही उमेदवार त्यासाठी सक्षम आहेत. नितेश राणेंच्या कार्याचे तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. रणजित देसाईही कर्तृत्ववान आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याने चांगले काम केले आहे. राजन तेलीही कार्यक्षम आहे. विधान परिषदेच्या कामाचा त्याला अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत या तीनही उमेदवारांना निवडून देऊन आपला सर्वागीण विकास साधू या, असे आवाहन राणे यांनी या वेळी केले.

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा राणे स्टाईल समाचार घेतला. पालकमंत्री दीपक केसरकर यांना जोकर म्हणत, विधिमंडळात धड उभं राहता येत नाही आणि बोलताही येत नाही, असे सांगून केसरकर यांच्या विरोधात टीका केली.

राजन तेली सक्षम उमेदवार आहे, तर १० वर्षे आमदार व पाच वर्षांत राज्यमंत्री होऊनही पालकमंत्री कुचकामी ठरला आहे, असे राणे म्हणाले.

सावंतवाडीचा गेल्या १० वर्षांत थांबलेला विकास पुन्हा मार्गी लागण्यासाठी राजन तेलींसारख्या हुशार, कर्तृत्ववान व अभयासू उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले आहे.

या वेळी बोलताना राजन तेली म्हणाले, जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारसंघात मिळत आहे. आरोग्य, रोजगार, पाणी अशा प्रश्नांवर केसरकर यांच्यावर जनता नाराज आहे. या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टिकोनातून जनता माझ्याकडे पाहत असल्याचे तेली यांनी सांगितले. देवतांच्या माझ्या बाजूने कौल आहे. सावंतवाडी नगर परिषदेचा भोंगा नऊ वाजता वाजला तो माझ्यासाठी शुभवर्तमान असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

चांदा ते बांदा योजना यशस्वीपणे राबवली गेली नाही. पालकमंत्र्यांनी भरपूर बैठका घेतल्या; परंतु योजनेचे फलित झाले नाही, फक्त निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करण्याचा झपाटा केसरकर यांनी लावला, असे राजन तेली यांनी सांगितले.

उद्योग आणणार, असे गेली अनेक वर्षे सांगणारे केसरकर निकामी ठरले आहे. राजन तेली म्हणाले, एकवीसशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगून तुलना करतात; परंतु तो निधी कुठे गेला? ते नोकऱ्या लावणार होते, त्याचे काय झाले? असे प्रश्नही राजन तेली यांनी या वेळी उपस्थित केले.

ते म्हणाले, गोव्या राज्याच्या मंत्र्यांची भीती केसरकरांना वाटत आहे. माझा विजय निश्चित झाला. पर्यटन पायाभूत सुविधा नसताना केसरकर गोव्यातील मंत्रिमंडळाला आहेत. हे चुकीचे असल्याचे सांगत आहेत. कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न माझ्यामुळे सुटला आहे. केसरकर फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.