कोल्हापूर : राज्यात नवे सत्तासमीकरण उदयाला येऊ न महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्य़ाला अधिक संधी मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या दृष्टीने कोल्हापूरचा गड महत्त्वाचा असल्याने या जिल्ह्य़ाकडे पक्षबांधणी, विस्ताराकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व काँग्रेसचे सतेज पाटील या अनुभवी माजी मंत्र्यांसह शिवसेनेतून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले प्रकाश आबिटकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची लक्षणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला ही सत्तासंधी पूरक ठरू शकतो.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची सलग १५ वर्षांची सत्ता ५ वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. विधानसभा निवडणुकीत सत्तावाटपावरून युतीत बेबनाव झाला.

फडणवीस यांना ३ दिवसांतच त्यांना पायउतार व्हावे लागले. आता  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झाले असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी थाटात करण्याची तयारी सुरू आहे. या नव्या सरकारचा विस्तार आणि त्यातून सत्तेचे झिरपणे कोल्हापूर जिल्ह्याच्या पथ्यावर पडणारे आहे.

महाविकास आघाडीत सहभागी तिन्ही पक्षांचा कोल्हापूर जिल्ह्य़ात प्रभावी ठसा आहे. तो अधिक दृढ करण्याबरोबरच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी सामना करून कमळाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला चांगली संधी मिळेल, अशी आशा बळावली आहे.

मुश्रीफ, सतेज यांना संधी

राष्ट्रवादीचे वजनदार नेतृत्व म्हणून पाचव्यांदा विजयी झालेले हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. अनुभवी आणि अल्पसंख्यांना संधी या माध्यमातून त्यांनाही मंत्रिपद मिळणार असे दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सत्ताकाळात त्यांच्या मंत्रिमंडळातील उजवे हात म्हणून सतेज पाटील यांना ओळखले जात असे. गृह विभागाची सूत्रे प्रभावीपणे चालवणारे पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष झाल्यावर आपल्या घराण्यात दुसरा आमदार निवडून आणण्या बरोबरच काँग्रेसचे संख्याबळ शून्य वरून चारवर आणण्याची लक्षणीय कामगिरी केल्याने त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीला बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, अशीही चर्चा आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे समर्थक त्यांना मंत्रिपद वा महत्त्वाचे महामंडळ मिळेल असा आशावाद बाळगून आहेत.

युतीच्या राज्यात शिवसेनेची उपेक्षा

गेली पाच वर्षे युतीचे सरकार असूनही भाजप वगळता शिवसेनेची कोल्हापूर जिल्ह्यात उपेक्षाच झाली. महसूल मंत्रिपद मिळाल्याने यांनी जिल्ह्य़ात भाजपचा प्रभाव वाढवला तरी विकासकामांच्या बाबतीत तो अपुरा ठरला. सत्तेतील शिवसेनेलाही प्रश्न मार्गी लागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. पाटील यांनी शिवसेनेचा संकोच केल्याची तक्रार होत राहिली. राजेश क्षीरसागर यांनी तर पाटील यांच्यामुळे आपले मंत्रिपद गेल्याची खंत अनेकदा व्यक्त केली. तर, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चार आमदार पाटील यांच्या कारवायामुळे पराभूत झाल्याचा राग शिवसेनेत व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजपशी स्पर्धा करून आपले स्थान बळकट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वेळी सहा आमदार असूनही एकालाही मंत्रिपद मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी होती. आता ही कसर भरून काढण्यसाठी प्रकाश आबिटकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता दिसत आहे.