27 May 2020

News Flash

शरद पवार यांच्या नातवाचे मंत्र्यापुढे आव्हान

निवडणुकीत मतविभागणी टाळण्याकरिता एकास एक लढत होईल, अशा पद्धतीने  नियोजन पवारांनी केले.

राम शिंदे रोहित पवार

लक्षवेधी लढत : कर्जत

अशोक तुपे, श्रीरामपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यातील लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पवार यांनी दिलेल्या आव्हानामुळेच बाहेरच्या उमेदवाराला बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राखीव असताना खासदार सदाशिव लोखंडे हे तीनवेळा भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते. सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्य़ात लोखंडे हे भाजपचे पहिले आमदार होते.  मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भाजपचे प्रा. राम शिंदे यांनी दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. शरद पवार यांचे नातू रोहित यांनी राजकीय कारकीर्दीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवड केली ती साखर कारखान्याच्या माध्यमातूनच. जगदंबा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर त्याचे खासगीकरण झाले. अंबालिका नावाने तो सुरू झाला. उजनी धरणाच्या फुगवटय़ावर कर्जत तालुक्यात मोठा ऊस पिकतो. सुमारे २० लाख टनाचे गाळप अंबालिका व बारामती अ‍ॅग्रो करते. त्यामुळे उसाच्या गाळपाचा प्रश्न सुटला. अंबालिकाचा कारभार दोन वर्षांपासून रोहित पवार पाहतात. शेतकऱ्यांशी संबंध आल्यानंतर त्यांनी राजकीय जुळणी सुरू केली. एक वर्षांपासून विधानसभेच्या तयारीला ते लागले. शाळा, महाविद्यालयांना मदत, आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धाचे आयोजन,  जनावरांना पशुखाद्याचे वाटप करून त्यांनी बांधणी केली. निवडणुकीत मतविभागणी टाळण्याकरिता एकास एक लढत होईल, अशा पद्धतीने  नियोजन पवारांनी केले.

रोहित पवार यांनी आव्हान उभे केल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवारप्रमाणेच रोहित पवार यांचे पार्सल बारामतीला पाठवा, असे आवाहन केले. तसेच ऊस गाळप केले जाणार नाही, असा दम दिला जात असल्यास नवा साखर कारखाना उभारू, असे सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जातीय समीकरणे महत्त्वाची

या मतदारसंघात जातीची समीकरणेही महत्त्वाची आहेत. इतर मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. मराठा कार्ड व माधव (माळी, धनगर, वंजारी) ही राजकीय बांधणी निकाल ठरवू शकते. कोटय़वधी रुपयांचा निधी मिळविल्याचा मुद्दा शिंदे मांडत असले तरी विकासकामे नित्कृष्ट प्रतीची झाल्याचा मुद्दा रोहित पवार पुढे करतात. राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने राष्ट्रवादीने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे.  राम शिंदे हे मूळच गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे. खातेबदलात पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2019 1:17 am

Web Title: karjat jamkhed assembly constituency rohit pawar against bjp leader mla ram shinde zws 70
Next Stories
1 बंडखोर हा बंडखोरच असतो
2 मोदींच्या सभेसाठी साताऱ्यात ‘सैनिक स्कूल’ची भिंत तोडली
3 तुटलेल्या वीजवाहक तारांच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
Just Now!
X