साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. राष्ट्रवादीने अन्याय केल्याचा पुर्नउच्चार उदयनराजे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, भाजपा प्रवेशावरून शरद पवार यांनी उदयनराजे यांना इतिहासाचा दाखला देत आरसा दाखवला आहे. “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, असे खडेबोल शरद पवार यांनी उदयनराजेंना सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केल्याचे सांगत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थित उदयनराजे यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे हे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत आहे. “सत्तेत असतानाही त्यांनी (राष्ट्रवादी) काही केलं नाही, मात्र तरी देखील मी सोबत होतो. मात्र माझा पराभव होईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते. लोकांच्या हिताविरोधात काही होतं असेल आणि प्रगतीच्या आड जर कोणी येत असेल, तर मी उघडपणे माझं मत व्यक्त करतो. हा माझा स्वभाव आहे आणि मग तो कुणाला आवडो अथवा न आवडो याचं मला काहीही देणंघेणं नाही. पहिल्या, दुसऱ्या निवडणुकीत जे मताधिक्यं मिळालं होतं, वाटलं होतं यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्यं मिळेल. पण मताधिक्यं लांबच राहिलं मात्र घसरण एवढी झाली की, नैतिकदृष्ट्या जर मला विचारलं तर निवडून जरी आलो असलो तरीपण मी हे समजतो की हा माझा पराभवचं झाला आहे. मग अशा लोकांबरोबर दिवस काढायचे तरी किती? प्रत्येकवेळी तेच अनुभव, आयुष्याचे १५ वर्षे म्हणजे थोडा काळ नाही”, अशी टीका त्यांनी केली होती.

दरम्यान, उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाचा शरद पवार यांनी समाचार घेत त्यांच्यासमोर इतिहासाची उजळणी केली आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्लीश्वरांच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, अशा शब्दात पवार यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे.

कुणाच्या जाण्यानं फरक पडत नाही-

उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली. यावर बोलताना पवार म्हणाले, “महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या!”