राज्याच्या 288 विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान पार पडलं. यात राज्याच्या विधानसभा मतदारसंघातील पहिला मतदार संघ असलेल्या नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातील मणीबेली गावातल्या केवळ एकाच मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे.

एकूण लोकसंख्या 1300 असलेल्या या गावात 328 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यातील 327 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर केवळ एकाच मतदाराने मतदान केलं. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मतदान करणाऱ्या एकमेव व्यक्तीनेही निवडणूक अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतरच मतदान केल्याची माहिती इतर गावकऱ्यांनी दिली. दुपारपर्यंत कोणीही मतदानाला न आल्याने अखेर अधिकारी गावात गेले आणि त्यांनी घराघरात जाऊन मतदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांनी नकार दिला केवळ एकाच मतदाराची समजबत काढण्यात त्यांना यश आलं.

सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या या मतदार संघातील गावात आज स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही वीज, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कमतरतेमुळे सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात रस्ते आणि वीजेची योग्य सोय नसल्याने येथील गावकऱ्यांनी याचा निषेध करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी ठराव करून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. तसेच येथील 25 घरांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. १७ सप्टेंबर रोजी सरदार सरोवर धरणात पाणी सोडण्यात आले, त्यानंतर या भागातील घरे पाण्याखाली गेली होती. हा निर्णय सर्व गावकऱ्यांना मान्यही होता. पण, सहदेव दळवी या व्यक्तीने निवडणूक अधिकाऱ्याने त्याची समजूत काढल्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यामुळे त्याची या मतदाराची नोंद झाली, अशी माहिती एका गावकऱ्याने दिली.