काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून सातत्याने विचारण्यात येतो. त्यांना एकच उत्तर आहे, सत्तर वर्षांत काँग्रेसने अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला, ती बरबाद केली नाही. परंतु, पाच वर्षांतच मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या रविवारी मुंबईत चांदिवली व धारावी येथे जाहीर सभा झाल्या. त्या वेळी बोलताना, त्यांनी मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारी वाढते आहे. मात्र त्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अविनाश पांडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नसिम खान, वर्षां गायकवाड, प्रिया दत्त व काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसने काय केले, असा भाजपकडून वारंवार प्रश्न विचारला जातो. त्यांना माझे उत्तर असे आहे की,  ७० वर्षांत देश उभा करण्याचे काम काँग्रेसने केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. सत्तर वर्षांत देशाची अर्थव्यवस्था काँग्रेसने कमजोर केली नाही; परंतु गेल्या पाच वर्षांत मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली. गुंतवणूक करण्यास कोणी धजावत नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. पुणे येथील वाहन उद्योगही बंद पडत आहेत. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. ४० वर्षांत कधी नव्हे इतके बेरोजगारीने भयानक रूप धारण केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, परंतु नरेंद्र मोदी मात्र त्यांना चांद्रयान दाखवत आहेत.

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या मुद्दय़ावरही राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या बँकेचे संचालक कोण होते, हे संचालक कोणाचे नातेवाईक आहेत, यावर मोदी किंवा फडणवीस का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मोठय़ा उद्योगपतींचे कोटय़वधींचे कर माफ केले, परंतु त्यांनी कधी गरिबांचे, शेतकऱ्यांचे,  लहान व्यवसाय करणाऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची अधोगती होत असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी, कष्टकरी, छोटे, मध्यम, मोठे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या योगदानातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते, परंतु मोदी सरकारने त्यांच्या हातात बेडय़ा घातल्या आहेत आणि फक्त पंधरा बडय़ा उद्योगपतींची ते रखवालदारी करीत आहेत. देशाचा विकास हा सर्वाना बरोबर घेऊन करायचा आहे, परंतु भाजपची विचारधारा ही समाज विभाजनाची आहे, अशी टीका त्यांनी केली.

 सरकारकडून जनतेची दिशाभूल

लातूर : नरेंद्र मोदी सरकार उद्योगपतीधार्जिणे आहे. हे सरकार दुसरे मुद्दे पुढे आणून जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका  राहुल गांधी यांनी रविवारी केली. औसा येथे बसवराज पाटील यांच्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते.