ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते, त्यादिवशी इतकं वातावरण तयार झालं असताना राजीनामा देण्याची काही गरज नव्हती असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दोन दिवस भावना आवरायला हव्या होत्या असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर शरद पवारांनी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल सांगत ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केला होता. त्यादिवशी सरकारविरोधात वातावरण पेटलं असताना अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सगळा फोकसच बदलला असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“अजित पवारांच्या त्या राजीनाम्याची अजिबात गरज नव्हती. तो राजीनामा दोन दिवसांनी दिला असता तरी चाललं असतं. त्या दिवशी प्रचंड आग पेटली होती. ईडीचा शरद पवारांवर हल्ला म्हणत सर्व फोकस शरद पवारांवर होता. वातावरण प्रचंड पेटलं होतं. दोन दिवस तरी सर्व मीडिया व्यापला असता. पण संध्याकाळ होत आली आणि सगळा फोकसच बदलला,” अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

“याच्यात पक्षाचा काय फायदा झाला, काय नुकसान झालं हे त्याचं त्याने ठरवावं,” असंही ते म्हणाले आहेत. “राजीनामा देण्याचं काही कारण नव्हतं. कशासाठी राजीनामा दिला ?निदान त्यादिवशी द्यायला नाही हवा होता. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं वातावरण निर्माण झालं होतं,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी, “अजित पवार भावनाप्रधान अमुक, तमुक आहेत वैगेरे सगलं मान्य…पण दोन दिवस भावना आवरल्या असत्या तर बरं झालं असतं,” असा टोलाही मारला आहे.