महिनाभराच्या सत्तानाट्यानंतर राज्यात अखेर गुरूवारी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधून पोस्टरद्वारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ८० वर्षाचा पैलवान ठरवणार तोच होणार, असं म्हणत फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
गुरूवारी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सत्तास्थापनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर आता बारामतीतही पोस्टरबाजी सुरू झाली आहे. ‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल, तोच होणार, कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्रं इथूनच हलतात साहेब…’ अशा आशयाचे पोस्टर लावून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी राज्य पिंजून काढलं होतं. त्याव्यतिरिक्त भर पावसातही सभा घेत शरद पवार यांनी भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला यानंतरही बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. अखेर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 12:50 pm