|| शेखर हंप्रस

शिंदेंवरील कारवाईवरून पाटील गटाविरुद्ध नाराजीचा सूर :- माथाडी कामगार वर्गात शिंदे आणि पाटील असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. माथाडी कामगारांची अवस्था कोणता झेंडा घेऊ  हाती, अशी झाली आहे. त्यात ऐरोली राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश शिंदे यांना संघटनेतून ज्या पद्धतीने काढून टाकले त्यावरून पाटील गटाविरोधात नाराजीचा सूर आहे.

ऐरोली विधानसभा निवडणुकीत माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरतात. आजवर या संघटनेने कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा हे एकमताने ठरवले जात होते. त्यावरून कुठलाही अंतर्गत वाद फारसा झडत नव्हता. मात्र सरचिटणीस असलेले नरेंद्र पाटील यांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर संघटनेत शशिकांत शिंदे यांना मानणारा वर्ग आणि नरेंद्र पाटील यांना मानणारा वर्ग असे गट पडले. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी राजकीय घोडदौड होत असताना प्रत्यक्षात माथाडी कामगारांचे मत विचारात घेतलेच नसल्याचा आरोप दोन्ही गटांतील कामगार करीत आहेत. या दोन्ही नेत्यांमधील दरी कितीही वाढली तरी संघटना अबाधित राहील, असा विश्वास नुकताच पार पडलेल्या दिवंगत अण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमात माथाडी नेत्यांनी दिला होता.

असे असले तरी ऐरोली विधानसभेत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले गणेश शिंदे यांना संघटनाविरोधी भूमिका घेतल्याचे ठपका ठेवत तडकाफडकी पदच्युत केल्याचे बहुतांश कामगारांना रुचले नाही. पदच्युत करणे वा न करणे यात आम्ही माथाडी हस्तक्षेप करीत नाही, मात्र लोकशाही पद्धतीची पायमल्ली करून शिंदे यांच्यावर कारवाई केल्याची खंत दोन्ही गटांच्या अनेक माथाडी कामगारांनी बोलून दाखवली.

आजघडीला पाचही बाजार समितीतील माथाडी वर्गात शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांचीच चर्चा आहे. या दोन्ही गटांतील माथाडी कामगार कामातून जरा उसंत मिळाल्यावर जमलेल्या बैठकीत नेत्याची बाजू हिरिरीने मांडताना दिसत आहेत, तर बुधवारपासून या विषयात गणेश शिंदे यांच्यावरील कारवाईच्या विषयाची भर पडली आहे.निवडणुकीनंतर कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावरही कारवाईचे सूतोवाच पाटील यांनी केले होते, शिवाय शशिकांत शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे संघटनेचे दोन शकले पडण्याची चिन्हे आहेत. याबाबत शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

गणेश शिंदे यांना काढावे की ठेवावे हा निर्णय काहीही घ्या मात्र अन्यायकारक पद्धतीने काढणे कोणालाही आवडलेले नाही. दोन नेत्यांत माथाडी कामगारांची अडचण करू नका.

– बबन संकपाळ, माथाडी कामगार

माथाडी कामगारांचा एकगठ्ठा मतासाठी वापर करून नेतेमंडळी राजकीय जीवन उभे करीत आहेत. कितीही म्हटले तरी येणाऱ्या माथाडी कामगारांचे भविष्य धोक्यात आहे, याचा विचार आवश्यक आहे. आमचे दोन नेते विविध पक्षांत होते, माथाडी काम होण्यासाठी संघटन गरजेचे असून सत्ताधारी पक्षाच्याच बरोबर गेले पाहिजे, याची गरज नाही.

-आनंद वाशीवले, माथाडी कामगार