राष्ट्रवादीच्या आमदाराने उमेदवारी नाकारली

श्रीरामपूर : गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मेव्हणे आणि शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुत्राने नगर जिल्ह्य़ात बंडाचे निशाण फडकविले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराने उमेदवारीच नाकारली असून, अन्य एका मतदारसंघातही राष्ट्रवादीवर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पुरस्कृत करण्याची नामुष्की आली आहे.

नगर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच्या दोघा माजी आमदारांनी पक्षाची उमेदवारी नाकारली. नेवासेतून पक्षाला त्यामुळे उमेदवार उभा करता आला नाही. आता माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गडाख यांना पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली. तर श्रीरामपुरातून शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी तर कोपरगावात भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविरुद्ध गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे आणि समर्थक राजेश परजणे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी  आघाडीच्या जागावाटपात नेवासे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग हे तीन माजी आमदार तर विठ्ठल लंघे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. अभंग किंवा लंघे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पण अभंग यांनी यापूर्वीच  शरद पवार यांना निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे कळविले. राष्ट्रवादीच्या या नेत्यांची काल रात्री बैठक झाली. त्यांनी प्राप्त  परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. माजी आमदार शंकर गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. ते राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. त्यांचा मागील निवडणुकीत कमी मतांनी पराभव झाला. आता तो होऊ  नये तसेच भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पराभूत करण्यासाठी गडाख यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात विखे यांचे मेव्हणे आणि समर्थक राजेश परजणे यांनी शुक्रवारी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. या वेळी विखे यांचे समर्थक आणि पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, अशोक वाघ हे उपस्थित होते. याच मतदारसंघातून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती, पण काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरुद्ध डॉ. लोखंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकांनी मागणी केल्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.

श्रीगोंदेमधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर साखर संघाचे अध्यक्ष व माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे याच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देऊ  केली होती. त्यांच्याशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. मात्र त्यांचाही नकार आला. जिल्हाध्यक्ष फाळके यांनी बैठक घेतल्यानंतर अखेर घन:शाम शेलार यांचे नाव निश्चित करण्यात आले.

शिर्डी, संगमनेरच्या लढतीतील रंगत टळली

गृहनिर्माणमंत्री विखे यांच्या विरोधात शिर्डीतून काँग्रेसने शरद थोरात तर संगमनेरमध्ये शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली. विखे व थोरात यांच्याविरुद्ध त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभे राहतील अशी चर्चा होती. संगमनेरमधून जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, तर शिर्डीतून आमदार सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचे आव्हान दोघांनीही परस्परांना दिले होते. मात्र दोघांनीही ते टाळल्याने लढतीतील रंगत टळली आहे.