13 December 2019

News Flash

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव

काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादीकडून कऱण्यात आलं आहे

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांशी चर्चा करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती शिफारस लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून ही तिसरी वेळ आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.

काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.

काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.

First Published on November 12, 2019 6:54 pm

Web Title: ncp sharad pawar shivsena uddhav thackeray bjp devendra fadanvis congress maharashtra political crisis sgy 87
Just Now!
X