“शिवसेनेला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव ठाकरेंना नक्की सांगेन,” असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे मत व्यक्त केले.

ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले जात आहे. आदित्य यांनी वरळी विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. अनेक शिवसेना नेत्यांनी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असे मत व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर आठवले यांना आदित्य मुख्यमंत्री होतील असं वाटतं का असा सवाल करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘ वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व अंबेडकरी मते आदित्य यांना मिळतील. मराठी मते मिळतील आदित्य ठाकरे चांगल्या मतांनी निवडुन येणार आहेत. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न शिवसेनेला रंगावायला हरकत नाही. मात्र सध्याचे चित्र पाहता माझ्या मताप्रमाणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे याच विषयावर बोलताना त्यांनी शिवसेनेच्या जास्त जागा आल्यास आदित्य यांच्याऐवजी उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असं मत मांडलं.
‘राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं. शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागू शकतो. पण अशावेळी आदित्य ठाकरेंचा नंबर लागण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. आदित्यऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी त्यांना सांगेन. आदित्यला मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेच तयारी आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला, जनतेला सर्वांना आदर आहे पण एकदम ते मुख्यमंत्री पद संभाळू शकतील असं वाटत नाही,’ असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळतील असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य यांनी आखीन काही काळ मुख्यमंत्रीपदासाठी वाट पाहायला हवी असंही आठवले म्हणाले आहेत. ‘सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त जागा या भाजपाच्या येतील आणि देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. मुख्यमंत्रीपदी उद्धवजींचा आणि आदित्य ठाकरेंचा नंबर लागेल असं वाटतं नाही. आदित्य यांना मुख्यमंत्री होण्यास वेळ आहे अजून १०-१५ वर्ष त्यांनी वाट पाहिली पाहिजे,’ असंही आठवले म्हणाले.