विधानसभा निवडणुकीचा प्रचार पुढील आठवडय़ात शनिवारी संपणार असल्याने हाती येणारा शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मॉर्निग वॉक, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या असे मतदारसंपर्काचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची सुरुवात रविवारी जळगावमधील सभेने झाली. जळगावबरोबरच विदर्भात साकोलीमध्ये मोदी यांची सभा झाली, तर अमित शहा यांच्या कोल्हापूर, कराड, शिरूर, लासूर अशा चार ठिकाणी सभा झाल्या. शिरूरमध्ये अमित शहा यांनी रोड शो करत शक्तिप्रदर्शन केले, तर नितीन गडकरी यांच्या विदर्भात विविध ठिकाणी सात सभा झाल्या. उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ात पाच ठिकाणी सभा घेतल्या.

भाजपने ‘मुंबई चाले भाजप’सोबत या उपक्रमाद्वारे मुंबई शहर व उपनगरातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ७ वाजता मरिन ड्राइव्हवर फिरायला आलेल्या मतदारांशी संवाद साधला.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, कुलाबा मतदारसंघाचे उमेदवार राहुल नार्वेकर त्यात सहभागी झाले, तर अतुल भातखळकर, पराग आळवणी, आशीष शेलार, मिहिर कोटेचा आदी उमेदवारांसह खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन यांनीही आपापल्या भागात प्रचारफेरी काढली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत प्रचारसभा घेतल्या. त्याचबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनाच्या आकाराच्या प्रचाररथावरून शहर व उपनगरांत फेरी मारली. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सायंकाळी प्रचारफेरी काढली. त्यात रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईकडे पाठ फिरवणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईकडे मोर्चा वळवला. धारावी आणि चांदिवली या दोन ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्याने काँग्रेसजनांत उत्साह संचारला.