यंदाच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी राज्यात आणि पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला, तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे. आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान अशा काव्यात्मक भाषेत मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, हवामान विभागाकडून पावसाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच खबरदारी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली असून पाण्याची गळती नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर, पुणे जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.