राज्यातील सत्तासंघर्षासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. ‘जनतेचा संविधान आणि लोकशाही तत्वांवर विश्वास कायम ठेवायचा असल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावरील व्यक्ती निष्पक्ष असायला हवी. यासंदर्भात राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी,’ अशी विनंती मराठी एकीकरण समितीने केली आहे.

समितीचे सदस्य असणाऱ्या गोवर्धन देशमुख आणि प्रदीप सामंत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर टीका करत या सर्व गोंधळाचा निशेष केला. राजभवनाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीचा संदर्भत देत कोश्यारी यांच्यावर समितीने टीका केली आहे. “राज्यापाल कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित आहेत. तसेच ते भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते अशी माहिती राजभवनाच्या अधिकृत वेबसाईटवर आहे. ते भाजपाच्या तिकीटावर निवडणुकाही जिंकले आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यपालपदी असताना घेतलेली भूमिका ही पक्षपात करणारी असल्याचे सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यावर दिसून येते,” असं समितीनं म्हटलं आहे.

“कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नंतर एका रात्रीत ती उठवून सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी शपथ दिली. हा सर्व प्रकार संविधान आणि लोकशाही प्रक्रियेला काळं फासणारा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला आणि संस्कृतीला हा प्रकार शोभणारा नक्कीच नाही,” असं समितीचे पदाधिकारी म्हणाले आहेत.

“राष्ट्रपती तसेच राज्यपाल ही संविधानाने हक्क दिलेली अती महत्वाची घटनात्मक पदे असून त्यांनी निष्पक्षपणे कोणाचेही हितसंबंध न जपता काम करणे अपेक्षित आहे. मात्र सत्तेच्या जोरावर या घटनात्मकपदांचा अपमान करणं सुरु आहे. आपल्या पक्षातील लोकांच्या बाजूने झुकते मत देताना ठराविक राज्यातील सत्ता आपल्या पक्षाच्या हातात रहावी यासाठी राज्यपालपदाचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका समितीने केली आहे. गोवा, मेघालय, मणिपूर, आणि कर्नाटकमध्येही राज्यपालांच्या भूमिकांमुळे काय घडले हे उघड आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच या पुढे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची नेमणूक करताना ते कोणत्याही पक्षाचे नेते असू नयेत अशी मागणी समितीने केली आहे. “पक्षनेत्यांची या पदांवर नियुक्ती टाळली तरच देशातील संविधान, लोकशाही तत्वांवर सामान्यांचा विश्वास कायम राहिलं,” असंही समितीनं म्हटलं आहे.