संदीप देशपांडे- मनसे माहीम मतदारसंघ

कट्टर मराठीप्रेमी मतदारांच्या दादर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे शिवसेनेला आव्हान देत आहेत. यंदा मनसेने प्रबळ विरोधी पक्षाची मागणी मतदारांकडे केली आहे. या नव्या भूमिकेसह, प्रमुख प्रतिस्पर्धी, ईव्हीएमचा विरोध, आयत्यावेळी सुरू केलेला प्रचार, राज्याच्या राजकारणातील पक्षाचे स्थान याबाबत देशपांडे यांच्याशी केलेली ही बातचीत.

सत्तेत येईल त्या पक्षाच्या मागे जनमत असते. विरोधी पक्षाची मागणी करणाऱ्या मनसेला मतदारांनी का मत द्यावे?

– विरोधी पक्ष म्हणून फक्त कागदोपत्री नोंद घ्यावी अशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात अवस्था आहे. या दोन्ही पक्षांमधील बहुतांश नेते, पदाधिकारी सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. जनतेचा या विरोधी पक्षावर अजिबात विश्वास नाही. लोकांचे प्रष्टद्धr(२२४)्ना घेऊन, लोकांसाठी भांडणारा विरोधी पक्षच राज्यात अस्तित्वात नाही. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. कारण जनतेचा विश्वास संपादन करणारा विरोधी पक्ष प्रबळ ठरतो आणि सत्तेचा दावेदारही. प्रबळ विरोधी पक्ष झालो की आम्ही सत्ता मागणारच.

 बदलत्या भूमिकांमुळे मतदार संभ्रमित होतात, यावर तुमचे काय म्हणणे आहे?

२०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे गेले होते. त्या भेटीत ठाकरे यांच्यासमोर विकासाचे चित्र, संकल्पना उभी केली गेली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने मोदींना पाठिंबा दिला. मात्र निवडणुकांनंतर हे चित्र फसवे आहे, याची जाणीव झाली. संपूर्ण देशात जी आज परिस्थिती निर्माण झाली ती पाहून यंदाच्या निवडणुकीत मोदींचा विरोध पक्षाने केला. त्यांचे फसवे रूप जनतेसमोर मांडले.

राज ठाकरे शिवसेनेला लाचार म्हणतात. मग न मागता मनसेने मोदी किंवा आघाडीला पाठिंबा दिला, ती लाचारी नाही का?

– पक्षाने जी भूमिका मांडली ती जाहीरपणे, छाती ठोकून मांडली. समोर असलेल्या परिस्थितीवरून मत बनत असते आणि त्यानुसार भूमिका आकार घेते. निवडणुका जवळ आल्या की जास्त जागा मिळवण्यासाठी मित्रपक्षावर आरोप करायचे, ही लाचारीच आहे. मनसेने सत्तेसाठी ही लाचारी कधीच केलेली नाही.

नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर असे प्रमुख नेते रिंगणाबाहेर का आहेत?

– उमेदवारासोबत पक्षही रिंगणात असतो. ठिकठिकाणी असलेली मतभिन्नता, नाराजी, गटातटाचे राजकारण निवळून काढत पक्ष एकसंध करावा लागतो. सभांचे आयोजन, प्रचाराची तयारी, रणनीती आदी जबाबदाऱ्या असतात. त्यासाठी अनुभवी नेत्यांची गरज असते. यंदा पक्षाने तरुणांना जास्त संधी देत त्यांना निवडणून आणण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे.

मनसेने आयत्यावेळी प्रचाराला सुरुवात केली. निवडणूक लढवायची म्हणून लढवता आहात, असेही आरोप होत आहेत?

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून प्रचार केला. माझ्यामते प्रतिस्पध्र्यानी केलेले दौरे आणि राज ठाकरे यांचे एक भाषण तराजूत ठेवल्यास भाषण जास्त वरचढ ठरेल. त्यामुळे या आरोपांना काही अर्थ नाही. निवडणूक मनापासून लढतो आहोत, प्रबळ विरोधी पक्ष हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून लढतो आहोत.

मुलाखत – जयेश शिरसाट