महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरणार आहे, तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विविध आमदार शिवसेनेला समर्थन देत आहेत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. निवडणूक निकालानंतर मातोश्रीवर धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे, शिवसेनेला तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला भविष्यात आणखी समर्थन मिळेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु आहेत. सध्या पक्षीय बलाबल पाहता सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आहे हे संजय राऊत यांनी सामनाच्या एका लेखातून म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणूक निकालात भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेना ५६ जागा मिळाल्या आहेत. ‘अब की बार २२० के पार’ हे प्रत्यक्षात उतरलं नाही. शरद पवारांनी विरोधकांना चेहरा दिल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागा वाढल्या. एवढंच नाही तर भाजपा आणि शिवसेना यांनाच जनमताने कौल दिला. मात्र भाजपा आणि शिवसेना यांना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही. त्यामुळे शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घ्या अशी अट ठेवली आहे. शिवसेनेच्या वाटाघाटी कशा चालणार आणि भाजपा त्यांना कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान शिवसेनेने मुख्यमंत्रीपद वाटून न मागता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांना आपण भेटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशात संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.