भेटीगाठींमुळे गैरसमज पसरणार नाही याची काळजी घ्यावी-भाजप

नाशिक पश्चिम मतदारसंघात बंडखोरीमुळे सेना-भाजपमध्ये दुफळी पडली असतांना शुक्रवारी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक पूर्व मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची अकस्मात भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आले आहे. राऊत यांच्या भेटीवर भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक काळात गैरसमज पसरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरातील एकही जागा सेनेला दिली नाही. यामुळे संतप्त सेना नगरसेवकांनी पालिकेतील गटनेते विलास शिंदे यांना भाजपच्या सीमा हिरे यांच्या विरोधात रिंगणात उतरविले. या बंडखोरीला नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रसद असल्याने शिंदे हे देखील शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत. सेना नेते खासदार राऊत यांनी नगरसेवकांशी चर्चा करूनही बंडखोरी शमली नाही. सेनेच्या कार्यपध्दतीवर भाजप आधीच नाराज असतांना त्यात शुक्रवारी आणखी भर पडली.

सकाळी राऊत हे आपल्या वाहनाद्वारे पंचवटी परिसरातून निघाले होते. गणेशवाडी परिसरात काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांचे कार्यालय आहे. मार्गस्थ होताना त्यांना हे कार्यालय आणि सानप दिसले. त्यांनी वाहन थांबवले. सानप यांची भेट घेतली. काही मिनिटांसाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले. राऊत यांचे अकस्मात आगमन झाल्याने समर्थकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सानप यांनी राऊत यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला. अवघ्या काही मिनिटांच्या भेटीने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.

सेना-भाजपमध्ये कुरबुरी सुरू असतांना राऊत यांनी भाजपची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीकडून नाशिक पूर्वची निवडणूक लढविणाऱ्या सानप यांची भेट घेऊन मित्रपक्षाला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. अर्थात, या भेटीमागे राजकारण किंवा विधानसभा निवडणुकीचे कारण नसल्याचा दावा राऊत यांनी केला.

रस्त्याने जातांना सानप यांचे कार्यालय दिसले. ते आमचे जुने सहकारी, मित्र आहेत. यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी कार्यालयात गेलो, असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

या भेटीविषयी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. नाशिक पूर्वमध्ये भाजपने सानप यांना उमेदवारी नाकारत मनसेतून आलेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांना मैदानात उतरविलेआहे. उमेदवार बदलल्याने हा मतदारसंघ भाजपने प्रतिष्ठेचा केला आहे. नाशिक पश्चिममध्ये सेनेच्या बंडखोरीमुळे आधीच वाद आहे. नाशिक पूर्वमधील भेटीमुळे त्यात भर पडल्याची भावना भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

रस्त्याने जातांना संजय राऊत यांची सानप किंवा अन्य कोणाशीही भेट होऊ शकते. निवडणूक काळात अशा  भेटी-गाठींवरून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज असते. नाशिक पश्चिममधील सेनेच्या बंडखोरीविषयी वरिष्ठांना माहिती दिली गेली आहे. शिवसेनेने सर्व मतदारसंघात युतीचा धर्म पाळावा, हीच भाजपची अपेक्षा आहे. – लक्ष्मण सावजी (प्रदेश पदाधिकारी, भाजप)