विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांची महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप-समाजवादी पार्टी-बहुजन विकास आघाडी आदी पक्षांची महाआघाडी, वंचित विकास आघाडी, एमआयएम, बसपा अशा छोटय़ा-मोठय़ा १३१ राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत ही भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळविणाऱ्या वंचित आघाडीचा किती प्रभाव राहतो, एमआयएम मुस्लीम मतांचे किती विभाजन करते यावरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून असेल.

राज्यात पुन्हा सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील २२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीला आघाडी मिळाली होती. यातूनच राज्यात २२० पेक्षा जास्त जागाजिंकणार, असा ठाम दावा युतीचे नेते करू लागले. भाजप आणि शिवसेनेत झालेली बंडखोरी किंवा परस्परांच्या उमेदवारांना अपशकून करण्याचे पडद्याआडून झालेले प्रयत्न यामुळे युतीमध्ये परस्परांबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक बडय़ा नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत केलेला प्रवेश आणि मरगळलेले विरोधक यामुळे विधानसभेची निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण विरोधकांनी अखेरच्या टप्प्यात जोर लावला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य पिंजून काढले. निकाल धक्कादायक असेल, असा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला मिळालेल्या सुमारे ४१ लाख मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. या वेळीही वंचितने जोर लावला आहे. वंचित सत्तेत येईल, असा दावा प्रकाश आंबेडकर हे करीत असताना, वंचित हा मुख्य विरोधी पक्ष असेल, असे भाकित व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला नामहोरम करण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची आघाडी होती. तेव्हा दलित आणि मुस्लीम मतांचे समीकरण जुळले होते. या वेळी जागावाटपावरून एमआयएमने वेगळी चूल मांडली. एमआयएम राज्यात ५४ जागा लढवित आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघांत एमआयएमला पाठिंबा मिळाल्यास त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांवर परिणाम होऊ शकतो.

राज्याच्या राजकारणात गेली पाच दशके महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या ठाकरे घराण्यातील आदित्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढविणारे ते पहिलेच आहेत.

काही मुख्य उमेदवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेचे आदित्य ठाकरे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे.