वेध विधानसभेचा

हर्षद कशाळकर, अलिबाग

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात

जिल्ह्य़ात शिवसेना-भाजपचा वाढत जाणारा प्रभाव आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला लागलेली गळती या पाश्र्वभूमीवर रायगडमधील सातही विधानसभा मतदारसंघांतील लढती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आपापले मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान यानिमित्ताने असेल.

कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. राज्यात भाजप आणि शिवसेनेला पुन्हा एकदा चांगले यश मिळाले असले तरी शिवसेनेच्या अनंत गीते यांना रायगड राखण्यात अपयश आले. पक्षांतर्गत नाराजी आणि मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश त्यांना मारक ठरले.

शिवसेना-भाजपवर शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी वरचढ ठरली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले.

स्वबळावर निवडणूक लढवून सातही उमेदवार निवडून आणण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात नाही, त्यामुळे युती आणि आघाडीवरच निवडणूक लढवण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा  प्रयत्न राहाणार आहे. शिवसेनेसाठी जिल्ह्य़ात भाजपच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा ही चिंतेची बाब आहे. कोकणात फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पक्षांतील प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊ न भाजपने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. अलिबाग, उरण, पेण, कर्जत या मतदारसंघांत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती झालीच तर यातील काही मतदारसंघांवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांत सुरू असलेले कुरघोडय़ांचे राजकारण युतीसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपले मतभेद विसरून पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. आपापली शक्तिस्थळे कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादी शेकापसोबत आघाडी व्हावी यासाठी आग्रही आहे. पण अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते या आघाडीसाठी फारसे इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीत आघाडी झालीच तर महाड विधानसभा मतदारसंघ सोडला तर काँग्रेसच्या वाटय़ाला काहीच येणार नाही. त्यामुळे अलिबाग आणि पेण या मतदारसंघांत काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघाने सुनील तटकरे यांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या मतदरासंघात तटकरे विरुद्ध तटकरे असा थेट सामना पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण आहे. कौटुंबिक वादामुळे अवधूत तटकरे हे गेली पाच वर्ष मतदारसंघात फारसे सक्रिय नव्हते. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या पक्षांतराचा अवधूत यांना फायदा होणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

गेल्या पाच वर्षांत पक्षाला लागलेली गळती ही राष्ट्रवादी काँग्रेससमोरील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी राष्ट्रवादीला यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणूक पक्षासाठी सोपी असणार नाही.

रायगड जिल्हा हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र पक्षांतर्गत एकाधिकारशाहीमुळे पक्षाचा प्रभाव कमी होत गेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेल आणि उरण मतदारसंघ शेकापने गमावले होते. तर लोकसभा निवडणुकीत शेकापने राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांना पािठबा दिला होता. मात्र अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या चारही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपेक्षित मताधिक्य मिळवून देण्यात शेकापला अपयश आले होते. त्यामुळे शेकापसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग, श्रीवर्धन आणि कर्जत शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला, तर पनवेल, उरण, पेण आणि महाड मतदारसंघात शिवसेना भाजप युतीला मताधिक्य मिळाले होते. पण सातपैकी चार मतदारसंघांत युती आणि आघाडीतील मताधिक्यातील फरक अत्यल्प होता. त्यामुळे या चारही मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पक्षीय बलाबल

’ अलिबाग-    शेकाप

’ पेण –      शेकाप

’ श्रीवर्धन-    राष्ट्रवादी काँग्रेस

’ महाड-      शिवसेना

’ पनवेल-     भाजप

’ उरण-       शिवसेना

’ कर्जत –     राष्ट्रवादी काँग्रेस