राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राजकारणात शिवसेनेने आजपर्यंत कधीही व्यापार केला नाही. आम्ही कोणाच्याही कोणत्याही गोष्टी ओरबडून घेतल्या नाही. महाराष्ट्राचा इतिहास याची साक्ष देतो. बंद दाराआड झालेल्या गोष्टी का बाहेर आल्या याचा विचार अमित शाह यांनीच करावा, असंही ते म्हणाले.

बंद दरवाज्याआड जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आमचा त्यांच्याप्रती आदर आहे. बंद खोलीत ज्या गोष्टी ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असंही ते म्हणाले.

जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो, तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही, असं शाह म्हणाले. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत. युती कोणत्या कारणामुळे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडण्याची इच्छा नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.