राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा १२ दिवसानंतरही सुटलेला नाही. असं असतानाच ‘सामना’च्या अग्रलेखामधून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांमधून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच हा तिढा कसा सोडवता येईल यासाठी राज्यातील नेते दिल्लीमधील बड्या नेत्यांच्या भेटागाठी घेत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमावारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटींमुळे राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींचा वेग आला असला तरी राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपाचा अशी चर्चा सुरु असतानाच अचानक शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या तसेच अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरच आता राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘शरद पवार हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत अशी चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल,’ असा सवाल राऊत यांना मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेमध्ये विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत यांनी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केलं. “ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. हे देशातील खूप मोठे नेते आहेत. त्यांना पुन्हा तुम्ही राज्यात का खेचत आहात. या अफवा जे लोकं परसरवत आहेत त्यांना सांगा हे बंद करा. या अफवांनी काहीच फायदा होणार नाही,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

‘अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असे अशी चर्चा आहे याबद्दल काय सांगाल’ असा सवाल यावेळी राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘हे असं पवारांनी किंवा सोनिया गांधी यांनी तुमच्यासमोर येऊन सांगितलं आहे का?’ असा उलटा सवाल राऊत यांनी पत्रकारांना केला. त्यावर अशी बातमी असल्याचे उत्तर पत्रकारांनी दिले. ‘अशा बातम्या आणि अफवा पसरत असतात सध्या जग हे अफवांवर चालले आहे,’ असं उत्तर राऊत यांनी दिलं.

तसंच पुढे बोलताना इतर पक्षांमध्ये दिल्ली काय घडलं हे आपल्याला ठाऊक नसल्याचंही राऊत यांनी सांगितलं. ‘तर पक्षांमध्ये काय सुरु आहे. त्यांनी बैठकीमध्ये काय निर्णय घेतले आहेत याबद्दल आम्हाला काहीच ठाऊक नाही. मी इतकचं सांगेन की महाराष्ट्राचा निर्णय महाष्ट्रातच होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छेप्रमाणे सरकार सत्तेत येईल,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.