भाजपच्या ताब्यातील ठाणे मतदारसंघासाठीही इच्छुकांच्या मुलाखती

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत युती होईल, अशी ग्वाही शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून दिली जात असली तरी, शिवसेनेने ठाण्यातील चारही मतदारसंघांत उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. ठाण्यात शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दोन मतदारसंघांखेरीज भाजपच्या ताब्यातील ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात आल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये ही युती कायम राहणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. एकीकडे जागावाटपाबाबत चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. भाजपच्या नेत्यांनी महिनाभरापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील चारही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्वबळाची चाचपणी केली होती. ठाणे शहर हा भाजपच्या तर कोपरी-पाचपखाडी, ओवळा-माजिवाडा हे मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेनेही चारही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा आहे. मुंबईतील शिवसेना भवनामध्ये गुरुवारी ठाणे  चारही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

चार जागा, नऊ इच्छुक

कोपरी-पाचपखाडी मतदारसंघामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेतील कोणत्याही इच्छुकाने अर्ज भरलेला नाही. ठाणे शहर मतदारसंघामधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, संजय भोईर आणि आमदार रवींद्र फाटक हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी गुरुवारी मुलाखती दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार असलेल्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघातून नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक सुधीर भगत आणि प्रदीप जंगम यांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार असलेल्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर नरेश मणेरा आणि शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी मुलाखती दिल्या.