देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरसाक्ष घेऊन आधी खरं बोलावं, ते खोटं बोलत आहेत तोपर्यंत संवाद साधणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भाजपावर सडेतोड टीका करत अनेक आरोप केले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय प्रथमच कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला असल्याची खंत व्यक्त केली.

“दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागत आहे की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, १० वेळा नाही, लाख वेळा विचार कर. त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असेल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही. मी ५ वर्षांत जनतेच्या हिताचे प्रश्न ठामपणे मांडले, ते मांडत असताना अनेकांना वाटले की हे सत्तेत पण आहेत आणि विरोधी पक्षात पण आहेत. पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी जनतेची बाजू मांडत राहिलो आणि सरकार मध्ये सामील होऊन न्याय मिळवून देत आलो,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

“लोकसभा निवडणुकीवेळी युतीची चर्चा सुरू असताना माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल. पण मी त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढा मी काही लाचार नाही असं सांगितलं”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

“मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. “पद आणि जबाबदारी यांच्या समसमान वाटप, पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही? आणि मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी आहे की नाही? आणि त्याचं समसमान वाटप हे नक्कीच ठरलेलं होतं,” असा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चा केला.

“देवेंद्र फडणवीस हे माझे अतिशय चांगले मित्र आहे, हे मी उपहासाने बोलत नाही आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला अन्यथा दुसरं कोणी असतं तर मला माहिती नाही काय झालं असतं. पण त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती,” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

“खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं. आता राम मंदिराचा निर्णय लागेल. तो निर्णय न्यायालय देईन. याचं श्रेय सरकारला घेता येणार नाही. सरकारला आम्ही कायदा करुन मंदिर बांधण्याची मागणी केली. राम सत्यवचनी होता. हे काय आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.