विधानसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा या मुद्यांवरून दोन्ही पक्षांची युती तुटली. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत महाशिवआघाडीचे सरकार राज्यात आण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी भाजपा-शिवसेनेने जर सत्ता स्थापन केली नाहीतर, या दोन्ही पक्षांच राजकीय नुकसान अटळ असल्याचे म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

जनतेने प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. पण शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात, मुख्यमंत्री पदावरून भांडण सुरू आहेत. या दोन्ही पक्षांनी राज्यातील शेतकर्‍यांचा विचार करता, एकत्र न येणे हा जनमताचा अपमान होईल. त्यामुळे दोघांनी एकत्र यावे आणि परस्परांमधील मतभेद विसरून राज्यात तात्काळ सरकार स्थापन करावे, असे मिलिंद एकबोटे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी भाजपाने जुने दिवस विसरू नये असा सल्ला देखील दिला. तसेच, शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. एकेकाळी १५ ते २० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला आहे. यामध्ये शिवसेनेचे योगदान आहे हे त्यांनी हे विसरू नये. लोकांना भाजप-शिवसेनेचे सरकार हवे आहे. यासाठी दोघांनीही एक पाऊल मागे येऊन एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदुत्वाची युती तोडून काँग्रेस आघाडीसोबत जाणे, योग्य नाही. ही अभद्र युती होऊ नये, असे त्यांनी यावेळी सांगितले. हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट होऊ नये, अन्यथा जनता माफ करणार नाही. असा इशारा देखील भाजपा व शिवसेनेला यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील सत्तास्थापनेचा अद्यापही सुटलेला नाही. महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू आहे. तर, त्या अगोदर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास हिरवा कंदील दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. हे पाहता राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.