उद्धव ठाकरे यांची आघाडीवर टीका

सांगली : समाजात जातीच्या भिंती उभ्या करून सत्ता हस्तगत करून तुंबडय़ा भरण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत केले असा आरोप शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी इस्लामपूरच्या प्रचार सभेत केला.

अपक्षाचे बांडगूळ उभा करून निवडणूक सोपी वाटत असली तरी कालचा पोरगा तुम्हाला आस्मान दाखवेल असा विश्वास त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळत केला.

वाळवा विधानसभा मतदार संघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरच्या यल्लमा चौकामध्ये ठाकरे यांची प्रचार सभा झाली. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धर्यशील माने, खासदार  संजयकाका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत सहभागी होतो, मात्र ज्यावेळी सरकारची पावले चुकीच्या दिशेने जाऊ लागली त्यावेळी विरोधही तितक्याच ताकदीने केला. आजही गरिबांच्या हिताविरूध्द होऊ  लागले तर सत्तेवर लाथ मारण्याची आमची तयारी आहे. मी शहरी माणूस असल्याने शेतीतीले फारसे काही कळत नसल्याचा आरोप होत असला तरी मला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नको असतात, यासाठी लढा देण्याची तयारी कायमचीच आहे. मला कर्जमाफी हा शब्द मान्य नाही, तर संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे, यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील. सर्वसामान्य रूग्णांसाठी एक रूपयात आरोग्य चाचणीचा आमचा शब्द असून तो पाळणारच असेही ते म्हणाले.

या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीला मॅनेज करून अपक्षाचे बांडगूळ उभा करून निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र एखादी व्यक्ती मॅनेज होऊ शकते, मतदार मॅनेज होत नाहीत हे निकालावरून सिध्द होईल असेही ठाकरे यांनी सांगितले.

क्रांतिकारकांची भूमी

वाळव्याची भूमी ही क्रांतिकारकांची आहे. या क्रांतिवीरांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कधीच प्रयत्न केले नाहीत, मात्र समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून प्रस्थापिताविरूध्द संघर्ष केला. याच क्रांतीचे वारसदार आज प्रस्थापितांना गाडण्यासाठी मदानात उतरले आहेत. याच क्रांतिवीरांच्या भूमीत लोकसभेवेळी धर्यशील माने यांनी इतिहास घडविला. तोच इतिहास आता घडविला जाणार असून या इतिहासाचे भागीदार होण्याचे भाग्य मतदारांना लाभणार असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले.