02 June 2020

News Flash

मुलाच्या कामांवर वडिलांची परीक्षा

नवी मुंबईचा उत्तर भाग असलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी राजकीय कलाटणी मिळाली आहे.

संग्रहित छायाचित्र

|| विकास महाडिक

नवी मुंबईचा उत्तर भाग असलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी राजकीय कलाटणी मिळाली आहे. गेली दहा वर्षे या मतदारसंघात प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप नाईक यांना वडिलांसाठी हा मतदारसंघ सोडावा लागला आहे. चार लाख मतदार संख्या असलेला हा मतदारसंघ ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी भागाने व्यापलेला आहे. यात झोपडपट्टी भाग जास्त आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा या ठिकाणी प्रभाव आहे. नाईक भाजपमध्ये आल्याने तळ्यात-मळ्यात असलेल्या चौगुले यांना आनंद झाला आहे. त्यामुळे ही व्होट बँक नाईकांच्या मागे उभी राहणार आहे. याशिवाय नाईकांचा एक मोठा मतदार या मतदारसंघात आहे. दहा वर्षांनंतर हा मतदार नाईकांना मतदान करण्याचा विचार करीत आहे. संदीप नाईक यांनी आपले वडील माजी मंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी उमेदवारीवर पाणी सोडले आहे पण त्यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या नागरी कामाचा लाभ वडिलांना होणार आहे. नाईकांना शह देण्यासाठी शिवसेना अप्रत्यक्ष आपला उमेदवार उतरविणार होती. बेलापूरमध्ये गेली अनेक महिने तयारी करणारे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण शेवटच्या क्षणी भाजपकडून शिवसेनेला युती धर्माची जाणीव करून दिल्यानंतर हा बंडखोरीचा प्रयोग फसला आहे. आता या मतदारसंघात होणारी लढत ही एकतर्फी राहणार आहे. मनसेचे नीलेश बाणखेले आपले नशीब अजमावणार आहेत पण नाईक वगळता इतर उमेदवार हे दखल घ्यावीत इतकेही प्रभावी नाहीत. या मतदारसंघात एका रिक्षावाल्यानेही आपले नशीब अजमावयाचे ठरविले आहे.

समस्या

 •  ठाणे-बेलापूर व मुलुंड-ऐरोली मार्गावर होणारी वाहतूक कोंडी
 •  गेली सहा वर्षे रखडलेला नाटय़गृहाचा प्रयोग
 • दुर्लक्षित झोपडपट्टी पुनर्वसन
 •  प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न
 •  आरोग्य सेवेतील कमतरता
 •  आमदारांनी केलेली कामे
 • पालिकेच्या शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न
 •  जॉगिंग ट्रॅक, योगा सेंटर आणि ओपन जीम
 •  राज्यातील पहिली ई बाईक आणि सायकलचा प्रयोग
 •  खेळांडूसाठी मैदाने तर कबड्डीपट्टूंसाठी मॅट
 •  सनदी अधिकारी घडवण्यासाठी पूरक गं्रथालय
 • पालिका शाळेत सायन्स सेंटरची उभारणी,
 • घणसोली तळवली, महापे, सविता केमिकल्स उड्डाणपूल

मतदार म्हणतात

ऐरोलीतील वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सकाळ-संध्याकाळ मुलुंड-ऐरोली मार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावर ही कोंडी वाढत चालली असून त्यावर पामबीच मार्गातील विस्तारित पामबीच मार्ग लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. आमदारांनी हा मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.-संजय शेलार, ऐरोली सेक्टर ९

ऐरोलीतील नाटय़गृहाला खूप विलंब झाला. त्या प्रकल्पातील कामात करण्यात आलेल्या खोदकामामुळे तीन जीव नाहक बळी गेलेले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या नाटय़गृहाच्या जागा आता बदलण्याची गरज असून ऐरोली सेक्टर आठकडे मोकळ्या भागात हे नाटय़गृह बांधण्यात यावे.-प्रशांत रावराणे, ऐरोली सेक्टर १९

गेली दहा वर्षे आमदार निधीचा सुयोग्य वापर करताना नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्यात आला होता. यात जॉगिंग ट्रॅक, खेळाची मैदाने, विरंगुळा केंद्र यांना प्राधान्य देण्यात आले होते. बगीच्यांचे शहर असलेल्या नवी मुंबईत गजेबो आणि इतर सुविधा निर्माण करण्यात निधी वापरला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदारसंघात दुसरे नाटय़गृह सुरू व्हावे यासाठी प्रयत्न कायम आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याला विलंब लागला आहे पण त्यामुळे या नाटय़गृहाची आसन क्षमता वाढविण्यात आली आहे. मी केलेल्या सर्व विधायक कामांचा फायदा माझ्या वडिलांच्या विजयासाठी होणार आहे – संदीप नाईक, माजी आमदार, ऐरोली

नवी मुंबई एक नियोजनबद्ध शहर आहे. त्यामुळे या नागरी सुविधांबरोबरच रोजगार, झोपडपट्टी पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. समोर आशिया खंडातील मोठी औद्योगिक वसाहत असताना आज अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे ही एक बिकट समस्या शहरात निर्माण झाली असून त्याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यावर झाला आहे. सिडकोच्या बैठय़ा घरांसाठी पुनर्वसन आणि झोपडय़ांसाठी एसआरए योजना राबविणे लक्ष राहणार आहे.-नीलेश बाणखेले, उमेदवार, मनसे, ऐरोली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 3:28 am

Web Title: vidhan sabha election bjp child father exam akp 94
Next Stories
1 ‘एपीएमसी’मध्ये कांद्याची आवक निम्यावर असूनही दरघसरण
2 रस्ता काँक्रीटीकरणाच्या अर्धवट कामामुळे नगरसेविकेचा बळी
3 नाईकांविरोधात ऐरोलीत नाहटा अपक्ष?
Just Now!
X