काँग्रेस-राष्ट्रवादीला लढण्यापूर्वीच पराभव मान्य

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातच राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. घडय़ाळाचे चिन्ह घ्यायला कोणी तयार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे पूर्णपणे बारा वाजले आहेत, अशी परिस्थिती इथेच नसून राज्यात सगळीकडे आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधीच पराभव मान्य केला असून पुढची २० वर्षे तरी त्यांना विरोधी पक्षात बसायचे आहे, असेही ते म्हणाले.

शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित रहाटणीतील सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीत कोणाशी लढायचे तेच कळत नाही. समोर विरोधकच नाहीत. राहुल गांधींना काँग्रेस पराभूत होणार असल्याची माहिती असल्यामुळेच ते बँकॉकला फिरायला निघून गेले. सुशीलकुमार शिंदे द्रष्टे नेते आहेत. आम्ही सगळे थकलो असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची भाषा सुरू केली. मात्र, विलीनीकरण केले तरी फरक पडणार नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपद घेण्यासाठी आवश्यक असणारे १० टक्के आमदारही निवडून आणता येणार नाहीत.

मुख्यमंत्री म्हणाले, पिंपरी-चिंचवडला २४ तास पाणीपुरवठा देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रखडलेली पाणीयोजना मार्गी लावण्यात येईल. दहा वर्षांपासून पोलीस आयुक्तालय हवे, ही मागणी होती. ती आपल्या सरकारने पूर्ण केली. पिंपरीला स्मार्ट सिटीत सहभागी करून घेतले. शास्तीकराचा निर्णय घेतला. मेट्रोचे काम सुरू केले. वाहतूक सुविधा सक्षम करण्याचे धोरण आहे. नद्यांचे वाढते प्रदूषण लक्षात घेऊनच नदीसंवर्धनाचे काम सुरू आहे. शहरविकासासाठी केंद्राने हजारो कोटी दिले, राज्याचीही तीच भूमिका आहे. प्रत्येक शहराचे चित्र बदलले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.

भोसरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला, त्याला भोसरीकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापौर राहुल जाधव, माजी खासदार शिवाजीराव आढळराव उपस्थित होते. संपूर्ण भोसरीच या रोड शोमध्ये सहभागी झाली होती, अशी टिपणी मुख्यमंत्र्यांनी सभेत केली.