नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेच्या बंडखोरीविषयी भाजपचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त होत असताना मंगळवारी बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना समर्थन देत शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांसह महानगरप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुखांकडे आपले राजीनामे दिले.

भाजपसोबत महायुतीत सहभागी होताना नाशिक शहरात शिवसेनेचे वर्चस्व असलेला नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडावा यासाठी सेना नेते आग्रही होते. परंतु जागावाटपात आपल्याकडे असलेला मतदारसंघ सोडण्यास भाजपने तयारी न दर्शविल्याने सुरुवातीपासून सेना विरोधातच राहिली.

नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर मतदारसंघातील शिवसेनेच्या २२ नगरसेवकांनी बंड करत सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. परंतु नाटय़मय घडामोडींमध्ये भाजपकडून सेनेला युतीधर्माचे पालन करण्याची आठवण वेळोवेळीकरून दिल्याने राजीनामाअस्त्र म्यान करण्यात आले होते. परंतु शिवसेनेचे पालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. बंडखोरास समर्थन देणाऱ्या नगरसेवकांबरोबर संजय राऊत यांनी बैठकही घेतली. परंतु नगरसेवकांनी भाजपकडूनच होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत बंडखोरास साथ देण्यावर ठाम राहिले.

दरम्यान, सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रचारसभा असताना या सभेला शिवसेना नेते, पदाधिकारी यांनी जाणे टाळले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना प्रचाराकडे लक्ष देण्यास सांगितले.

ही बंडखोरी नसून अन्यायाविरुद्ध बंड आहे. नाशिक पश्चिमची जागा शिवसेनेला सोडली नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांच्या समर्थनार्थ दोन्ही महानगरप्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांसह ३५ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद करीत कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.

राजीनामा असला तरी शिवसैनिक म्हणून सक्रिय

भाजप हा सेनेचा बालेकिल्ला बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. विलास शिंदे उमेदवार म्हणून उभे असले तरी ते सेनेचे प्रतीकात्मक प्रतिनिधी आहेत. नाशिक पश्चिमवर आमचा अधिकार आहे. शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही एकदिलाने प्रयत्न करणार आहोत, परंतु याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास होऊ नये यासाठी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. मात्र सच्चा शिवसैनिक म्हणून आम्ही सदैव काम करत राहू. -अजय बोरस्ते (विरोधी पक्षनेता, महापालिका)