|| सुशांत मोरे, अमर शैला

शहरातील मतदारसंख्येत वाढ; उपनगरांतील मतदारांच्या संख्येत चार लाखांची घट:-  मुंबई : मुंबईचा विस्तार आता उपनगरांत अधिकाधिक होऊ लागल्याने त्या भागांत लोकसंख्येचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण असताना मतदारवाढीत मात्र शहराने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. २०१४ मधील विधानसभेच्या तुलनेत २०१९ मध्ये मुंबई शहरांतील मतदारांत चांगलीच वाढ झाली आहे. भायखळ्यातील मतदार १८ हजारांनी वाढले असून वांद्रे, माहीम, धारावीतही मतदारांच्या संख्येत भरघोस वाढ झाली आहे. याउलट उपनगरांतील २६ मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघांतील मतदारांच्या संख्येत एकूण ४ लाख ८४ हजारांची घट झाली आहे.

प्रत्येक निवडणुकीत नवमतदार, मतदारांचा मृत्यू, स्थलांतर आदी कारणांमुळे मतदार संख्येत बदल होत असतो. परंतु आतापर्यंत उपनगरात मतदारांची संख्या कायम वाढत आली आहे. स्थलांतर हे त्यामागील मुख्य कारण आहे. मात्र गेली काही वर्षे उपनगरातील अनेक प्रकल्पांमधील घरांना फारशी मागणी नाही. दुसरीकडे शहरातील गिरण्यांच्या जागेवर राहावयास आलेले कामगार, जुन्या चाळी, इमारतींचा, वाडय़ांचा झालेला विकास यामुळे मतदारसंख्या कधी नव्हे ती वाढली आहे.

मुंबई शहरात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा मतदारसंघ येतात. येथील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, चाळींतील रहिवाशी अनेक कारणांमुळे उपनगराकडे धाव घेत असत.

शहरात स्वस्तात मोठी घरे विकत घेण्याबरोबरच भाडय़ाने राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षांत शहरातील अनेक भागांत मार्गी लागलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे शहरी भागांतील लोकसंख्या पर्यायाने मतदारसंख्या हळूहळू का होईना वाढते आहे. २०१४च्या आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकांची तुलना करता शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी मलबार हिल सोडता उर्वरित नऊ मतदारसंघांतील मतदारांत वाढ झाली आहे.

भायखळ्यात  सर्वाधिक वाढ

भायखळ्यातील मतदार १८ हजार ७५५ने तर धारावीत ११ हजार १५९ने मतदार वाढले आहेत. फक्त मलबार हिलमध्ये २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी २ लाख ७७ हजार ५८६ असलेली मतदारसंख्या कमी होऊन २ लाख ६२ हजार ३९३ वर आली आहे. जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त मतदार येथे घटले आहेत.

लोकसभेच्या तुलनेत वाढ

मुंबई उपनगरात ७२ लाख ६३ हजार २४९ मतदार आहेत. मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्य़ातील मतदारांच्या संख्येत १ लाख १५ हजार ५९० एवढी वाढ झाली आहे. परंतु २०१४च्या विधानसभेशी तुलना करता त्यात घट झाल्याचे दिसते.

दहिसरमध्ये सर्वाधिक घट

मुंबई उपनगरातील २६ विधानसभा मतदारसंघापैकी २५ विधानसभा मतदारसंघांतील मतदार २०१४च्या तुलनेत २०१९ मध्ये एकूण ४ लाख ८४ हजार २७ ने कमी झाले आहेत. दहिसरमधील ६१ हजार ३२८ मतदार घटले असून चांदिवलीमधून ३८ हजार ४२१ आणि त्यापाठोपाठ अणुशक्तीनगरमधील ३७ हजार ३५० मतदार कमी झाले आहेत.

मुंबई उपनगरमधील मतदार कमी झालेले मतदारसंघ

  • मतदारसंघ                २०१४                  २०१९
  • दहिसर                     ३१६६०७                २५५२७९
  • मागाठाणे                 ३०७७३५                २७४०५६
  • चारकोप                   ३१६८६७                २८८५७८
  • चांदिवली                 ४१७७००                 ३७९२७९
  • घाटकोपर                 ३०३१७२                  २७१२८५
  • अणुशक्तीनगर          २८९१८८                २५१८३८

मुंबई शहर जिल्ह्य़ात मतदारांत वाढ झालेले मतदारसंघ

  • मतदारसंघ                २०१४                    २०१९
  • धारावी                    २३९०७३                २५०२३२
  • सायन कोळीवाडा       २५४१६३               २५७२६७
  • वडाळा                    १९६९५१                  २०३७३४
  • माहीम                     २३२५६६                २३५४५५
  • वरळी                      २६५०९१                २६८९३२
  • शिवडी                    २७३४९५                २७४८९०
  • भायखळा                 २२७१४३               २४५८९८
  • मुंबादेवी                   २३७७४३                २४४१४२
  • कुलाबा                   २५३९२९                २६६५१०