मधु कांबळे

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त पाटय़ा टाकण्याचे काम केले, काहीही नवीन केलेले नाही, किंबहुना आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी हे भाजपच्या धार्मिक राजकारणाचे परिणाम आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरली होती. आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या वंचित आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, निवडणुकीत आघाडीची कशी कामगिरी राहील, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण, तसेच भाजप-शिवसेना सरकारचा कारभार या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी काँग्रेसबद्दल काही बोलण्यास नकार दिला, तर युती सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष आहे, असे  सांगितले. वंचित आघाडी विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवीत आहे, आता जात तोडून मतदान केले जाते का हा खरा प्रश्न आहे. निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूने राहील, यावर मतप्रदर्शन करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

  • या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेऊन मतदारसंमोर गेली?

– राज्यातील पोलिसांना आठ तासांचे काम असावे, अंगणवाडी, आशा व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही घेतलेलेले आहेत. कापसाचा प्रश्न आहे. कापसाचा भाव चार हजार रुपयांनी पडलेला आहे. पाकिस्तानकडून साखर घेतलेली आहे, त्यामुळे आपले साखर कारखाने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही. हे विषय लोकांसमोर मांडत आहे. मुंबईच्या चारही बाजूंनी समुद्र आहे. त्याचा जलवाहतुकीसाठी वापरच केला गेला नाही. जलवाहतुकीसाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे. राज्यातील धरणांतील पाण्याचा विजेसाठी वापर करायचा का हा प्रश्न आहे. देशात सध्या पाच टक्के अधिकची वीज आहे. विजेसाठी पाणी वापरले जाते ते सगळे वाया जाते. खोपोलीतले टाटा धरणातील पाणी वाया जाते आणि कोयनेतील पाणीही वाया जाते. त्यामुळे वीज अधिक असताना विजेसाठी पाणी कशाला वापरायचे, विजेसाठी पाण्याचा वापर हळूहळू कमी केला पाहिजे आणि ते पाणी दुष्काळी भागाकडे वळिवले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) खासगी विकासकांमार्फत राबविली जाते, ती सरकारतर्फे राबविली पाहिजे. झोपडपट्टीधारकांना  ५५० चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे. परळ- एलफिस्टन ते माटुंगा (पूर्व-पश्चिम) आणि वडाळा – शिवडी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पट्टय़ात वांद्रे-कुर्ला संकुलासराखा (बीकेसी) विकास करता येईल. मात्र तरंगता (फ्लोटिंग) बीकेसी प्रकल्प असेल, म्हणजे पावसासाठी व खेळण्यासाठी जागा मोकळी राहिली पाहिजे, अशी आमची कल्पना आहे. असे आमचे अनेक  विकासाचे मुद्दे आहेत, जात तोडून त्यावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा आहे.

  • आपण आपल्या सभांमधून काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता, तरीही निवडणुकीत युती करण्याची भूमिका आपण घेतली, युती झाली नाही, परंतु कोणत्या मुद्दय़ावर समझोता करण्याची तयारी होती?

काँग्रेस हा विषय आता माझ्यासमोर राहिलेला नाही. आम्ही आता सत्ता संपादनाच्या दिशेने चाललो आहोत.

  • राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराबद्दल आपली भूमिका काय आहे?

– या सरकारने गेल्या पाच वर्षांत फक्त पाटय़ा टाकण्याचे काम केले आहे. नवीन काय केले ते त्यांनी सांगावे. कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल, यांनी लोकांना अजिबात मदत दिलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष आहे. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभाही अपयशी ठरल्या आहेत.

  • प्रत्येक निवडणुकीत प्रचारात एक मुद्दा असतो तो म्हणजे धर्मनिरपेक्षता, हा मुद्दा या वेळी मागे पडला आहे का?

– धर्मनिरपेक्षता मुद्दा मागे पडला आहे असे नाही, परंतु भाजपला या मुद्दय़ावर पिछाडीवर जावे लागले आहे. त्याचे कारण बँका बुडत आहेत, अर्थ व्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे. उद्योग बंद पडून मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे, भाजपच्या धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या राजकारणाचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.