महायुतीला जनतेने कौल दिला असला तरीही आता शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे यात काहीही शंका उरलेली नाही. शिवसेना काय करणार यावर सत्तेच्या सारीपाटावरची गणितं ठरणार आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपाने महायुतीच्या २२०+ जागा येतील अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या जागा १६३ च्या आसपास आल्या. त्यामध्ये भाजपा आणि मित्रपक्षांच्या १०७ जागा आल्या तर शिवसेनेच्या ५६ जागा आल्या. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार यात काहीही शंका नाही. अशात भाजपा शिवसेनेपुढे काय असू शकतात पर्याय याचा विचार करता येऊ शकतो.

पर्याय क्रमांक १ 

भाजपा आणि मित्रपक्षांना शिवसेना साथ देईल आणि महायुतीचं सरकार राज्यावर येईल. आमचं ठरलंय सगळं ५०-५० असं उद्धव ठाकरेंनी कालच स्पष्ट केलं आहे. असं झाल्यास देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पाठिंबा देईल आणि त्याबदल्यात महत्त्वाची खाती आपल्याकडे घेऊन सत्तेत सहभागी होईल अशी एक शक्यता आहे. असं झालं तर शिवसेना गृहखातं, अर्थखातं कदाचित उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे मागून घेऊ शकते आणि वाटाघाटी करु शकते.

पर्याय क्रमांक २

दुसरा पर्याय आहे तो शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येण्याचा. १४५ जागांसाठी एकत्र येणं आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हा शिवसेनेपुढचा पर्याय असू शकतो. असं झाल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर येईल. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं असेल तर शिवसेना या पर्यायाचा विचार नक्कीच करु शकते. शिवसेना ५६+ राष्ट्रवादी ५४+ काँग्रेस ४५ असा एक पर्याय समोर येऊ शकतो. असं घडल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. शिवसेना आणि उद्धव ठाकरे ही रिस्क घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शिवसेनेला दारं खुली ठेवली आहेत. भाजपाला दूर ठेवण्यासाठी या दोन पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात.

पर्याय क्रमांक ३

सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेने खूपच मागण्या केल्या तर अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेऊन भाजपाची सत्ता येऊ शकते. राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणूक निकालाच्या दिवशीच भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. तूर्तास शरद पवार यांनी अशी काही भूमिका घेतलेली नाही. मात्र शिवसेनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात.

भाजपाला २०१४ मध्ये १२२ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीने भाजपाला निकालाच्या दिवशीच पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खाऊन टाकली होती. मात्र यावेळी चित्र वेगळं आहे. यावेळी अशी कोणतीही खेळी शरद पवारांनी खेळलेली नाही. आता निर्णायक भूमिका आहे ती शिवसेनेची. शिवसेना काय करणार? वाटाघाटी करुन युतीधर्म पाळणार की वेगळ्या पर्यायांच्या विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.