निवडणूक म्हणजे पदयात्रा, भेटीगाठी, पत्रक वाटणे, सभाद्वारे गर्दी आणि शक्तिप्रदर्शन. आधुनिकतेच्या काळात हा ‘ट्रेंड’ बदलत  असून जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत उमेदवार हायटेक  प्रचार करून कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे, जाहिराती प्रसारित करणाऱ्यांपासून ते प्रचाराची ऑडिओ, व्हिडिओ गाणी तयार करणाऱ्या कलाकारांना आर्थिक मंदीचा फटका बसल्याचे दिसते.

यंदा सर्वच पक्षांचा युती, आघाडी होण्यात बराच कालावधी गेला. उमेदवारांच्या याद्यांना उशीर झाला, त्यामुळे प्रचारसामुग्रीची छपाई वेळेत करून घेणे हे आव्हान उमेदवारांसमोर होते. त्यात प्रचारांचे फलक तयार करणाऱ्यांकडे उमेदवारांनी धाव घेतली, पण उमेदवारांचा प्रतिसाद फारच कमी असल्याचे अनेक जाहिरात एजन्सीच्या संचालकांनी सांगितले. प्रचारगीते तयार करण्यातही उत्साह दाखवलेला नाही.

प्रचारासाठी दुपट्टे, टोप्या, शर्टाना लावण्यात येणारे बिल्ले, प्रचार पुस्तिका, पत्रके तयार करण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावावी लागते. अलीकडच्या काळात रेडिमेड प्रचार सामग्री येत असली, तरी उमेदवाराला वैयक्तिक प्रचारासाठी छापील सामग्री तयार करावी लागते, पण अनेकांनी त्याकडे पाठ फिरवून समाज माध्यमांवरच अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचारात सामाजिक अभियांत्रिकीचे प्रयोग सुरू झाले आहे.

राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा, प्रचार पदयात्रा, रोड शो, कोपरा सभा होतात, त्यांचीही संख्या कमी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बूथ यंत्रणा प्रचार व मतदारांना मतपत्रिका पोहोचवणे, मतदान पार पाडणे ही प्रक्रिया केली जात असे. पण आता गतिमान युगात बदल होत आहेत. त्याच पद्धतीने निवडणुकीचा ट्रेंडही बदलत आहे. मतदार याद्या, प्रचार ऑनलाईन झाला. मतपत्रिकेवरुन इलेक्ट्रॉनिक मशीन आले. तसेच सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचारात नवीन व्यूहरचना केली आहे.

सभा, गर्दीला महत्त्वच

निवडणुकीचा ट्रेंड कितीही बदलत चालला, तरी प्रचार सभा आणि होणारी गर्दी यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यातील राजकीय अनुभव व पाडापाडीचे राजकारण यालाही महत्त्व आले आहे. त्याचबरोबर कोणत्या गावात कुणाचे मतदान यावरही अनेक जण व्यूहरचना आखत आहेत. त्यामुळे या बदलत्या युगात कितीही नवनवीन इलेक्ट्रॉनिक साहित्य आले, तरी सभा व गर्दीला आजही महत्त्व आहे.

भित्तीपत्रके, स्टिकर्स, कार्यकर्त्यांना शर्टावर लागणारे बिल्ले याची मागणीच दिसून येत नाही. केवळ मोठी फलके लावण्याकडे उमेदवारांचा कल आहे. आधीच्या निवडणुकांमध्ये छापील प्रचार सामग्रीवर भर होता. लोकांपर्यंत पोहचताना त्यांना उमेदवारांची ओळख देण्याचा हा सहजसोपा उपाय होता. राजकीय पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याची संधी या निमित्ताने मिळत होती, पण यावेळी छापील सामग्रीचे प्रमाण कमी झाले आहे.   – सुनील देशमुख, संचालक, प्रसिद्धी मीडिया सोल्यूशन्स