देवळा तालुक्यातील चिंचवे येथे बंधाऱ्याच्या दुरुस्तीवेळी मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झालेल्या पाच अभियंत्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. दुसऱ्या विभागाच्या मुख्य अभियंत्यामार्फत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून ठेकेदार कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
चिंचवे येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी बंधाऱ्यापासून सुमारे ५० फूट खोल चर खोदण्यात आला होता. त्याची पाहणी करताना सोमवारी लघु पाटबंधारे विभागाचे (स्थानिक स्तर) उपअभियंता एच. एम. पाटील, एस. जी. सोनवणे, शाखा अभियंता पी. यू. सूर्यवंशी, ए. के. शेवाळे, व्ही. एच. आहेर यांच्यावर मातीचा ढिगारा कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ, जलसंधारणमंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री सुरेश धस यांनी मंगळवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. चाळीसगावच्या ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामाची पाहणी करणाऱ्यांमध्ये सदोष कामामुळे निलंबित झालेल्या एस. जी. सोनवणे या अधिकाऱ्याचाही समावेश होता, अशी माहिती राऊत यांनी दिली.