मुंबई : महाविकास आघाडी सरकारने १३ टक्के वीज दरवाढ सर्वसामान्यांवर लादली असून राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वीजदरवाढ असल्याचे भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका जनतेला बसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

ऊर्जा मंत्रालयाने केलेल्या वीज दरवाढीसंदर्भात बावनकुळे म्हणाले, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत महावितरण, महापारेषण आणि महाजेनको विद्युत निर्मिती प्रकल्पांना झालेला खर्च भरून काढण्यासाठी ऊर्जा खात्याने ही दरवाढ केली. राज्याचे ऊर्जा मंत्रालय हा अधिकचा खर्च सर्वसामान्यांच्या वीज बिलातून वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे.  

राज्यात औद्योगिक क्षेत्रात २५ टक्के आणि घरघुती वीजग्राहकांना १५ टक्के प्रति युनिट वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागणार असल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ऊर्जा खात्याकडून होत असलेल्या कोळशाच्या धोरणात्मक चुकांकडे लक्ष वेधले.