जून महिन्यात धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे, रायगड जिल्ह्यातील १४ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यातील तीन धरणांमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. मात्र अद्यापही रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ८ धरणांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी साठा शिल्लक आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील शेतीसाठी ही चिंतेची बाब आहे. जुल महिन्यात पावसाने नेहमीची सरासरी गाठली नसली, तरी जिल्ह्यातील २८ धरणांमधील पाणी साठय़ात समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही एक समाधानाची बाब आहे. कोलाड येथील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारी तब्बल १४ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यात फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, िखडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले या धरणांचा समावेश आहे. तर घोटवडे, कुडकी, पुनाडे या धरणांमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते-मोकाशी, डोणवत आणि पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात ५० टक्केपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे.
मात्र जिल्ह्यातील इतर आठ धरणांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे, ही चिंतेची बाब आहे. यात प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, सुधागड तालुक्यातील ढोकशेत, श्रीवर्धन तालुक्यातील रानवली, कर्जत तालुक्यातील साळोख आणि अवसरे, पनवेल तालुक्यातील बामणोली, तसेच उरण तालुक्यातील पुनाडे धरणांचा समावेश आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील जुल महिन्यातील समान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत ही आकडेवारी किती तरी कमी आहे. जिल्ह्यात दरवर्षी चार महिन्यांत सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत यावर्षी जुल महिन्याच्या १२ तारखेपर्यंत सरासरी ९४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पर्याप्त पाणी साठा झाला असल्याने जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई जाणवणार नसली, तरी जिल्ह्यातील शेतीसाठी पावसाची अनियमितता घातक ठरण्याची शक्यता आहे.