लक्झरी बस उलटून अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर निगडेजवळ लक्झरी बस पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
बोरीवलीहून गुहागरला जाणाऱ्या लक्झरी बसला मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी पहाटे २च्या सुमारास पेण तालुक्यातील निगडे इथे बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या वेळी बसमधून ३२ जण प्रवास करत होते. स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस तीन पलटय़ा खाऊन रस्त्याच्या कडेला गेली.
अपघात इतका भीषण होता की यात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यात सुवर्णा सुभाष घडशी, वय ५०, राहणार पोमेडी गुहागर आणि रामचंद्र बेंडू खापरे, वय ६५, राहणार कुटगिरी-पाथेवाडी गुहागर या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य ३० जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वडखळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.