ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनभ्रमंतीसाठी या शहरातून २१ आसनांच्या मिनीबसचा शुभारंभ वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, ताडोबाचे क्षेत्र संचालक जे.पी. गरड, चंद्रपूर वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुधाकर डोळे, विभागीय व्यवस्थापक पाटील, ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक नरवने, कोअरचे उपसंचालक कळसकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक राहुल पावडे, निलेश खरबडे, शैलेंद्रसिंग बैस, प्रकाश धारणे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. ताडोबात वनभ्रमंतीसाठी दुसरी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्वानी आभार मानले. सदर नवी बस ४ जूनपासून नियमितपणे सकाळी ६ व दुपारी २ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, क्षेत्र संचालक कार्यालय, मूल रोड येथून निघेल. वनपर्यटनासाठी या बसमध्ये प्रतिव्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ताडोबात वनपर्यटनाकरिता देशविदेशातून अनेक पर्यटक येत आहेत. सर्व सहाही प्रवेशव्दारातून ऑनलाईन बुकिंग सुरू असून पावसाळ्यातही असेच बुकींग होणार आहे.
विशेष म्हणजे, याच कार्यालयातून सध्या १९ आसन क्षमतेची बस सुरू आहे. सदर बसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन निसर्गप्रेमी पर्यटकांना सोयीचे होण्याकरिता ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक जे.पी. गरड यांनी वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थाापक सुधाकर डोळे यांना विनंती करून २१ आसन क्षमतेची बसची मागणी केली होती. त्यानुसार ही बस सुरू करण्यात आली असून पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक जे.पी. गरड यांनी केले आहे.